औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सूक्ष्म निरीक्षकांचे पहिले प्रशिक्षण संपन्न
परभणी, (प्रतिनिधी) ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सूक्ष्म निरीक्षकांनी आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी. मतदान केंद्रावरील प्रत्येक घडामोडीचे बारकाईने निरीक्षण करून निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे पहिले प्रशिक्षण आज सोमवार (दि.१२) रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, शैलेश लाहोटी उपस्थित होते. या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका, जबाबदाऱ्या, निवडणूक प्रक्रियेतील विविध बारकावे आणि मतदानाच्या वेळी घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, विहित कार्यपद्धती तसेच मतदान प्रक्रियेच्या निरीक्षणादरम्यान करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली.
*अनुपस्थित राहणाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा*
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांनी त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावरील घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करून विहित सूचनांचे पालन करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
दरम्यान, प्रशिक्षणास अनुपस्थित राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. संबंधितांकडून प्राप्त होणारा खुलासा असमाधानकारक असल्यास नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
निवडणुकीसाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहून निवडणूकविषयक सूचना आणि कार्यपद्धतींची माहिती घेणे आवश्यक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
*****


