परभणी,(प्रतिनिधी) : सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने तिकीट तपासणी मोहिमा तीव्र केल्या आहेत. विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासह रेल्वे महसुलाची गळती रोखण्यासाठी रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये विशेष तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी एकूण 562 प्रकरणे आढळून आली असून, त्यातून 5 लाख 25 हजार 205 रुपयांची वसुली करण्यात आली.
9 ऑक्टोबर रोजी सकाळी 4.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक शैलेश कुमार सिंह यांच्या निरीक्षणाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत 31 तिकीट तपासणी कर्मचार्यांनी सहभाग घेतला. एकूण 21 गाड्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी 505 प्रकरणे आढळून आली असून, 3 लाख 92 हजार 120 रुपयांची वसुली करण्यात आली.
यामध्ये विनातिकीट प्रवासाची 303 प्रकरणे आढळली. त्यातून 1 लाख 64 हजार 775 रुपये भाडे आणि 1 लाख 51 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. अनियमित प्रवासाच्या 69 प्रकरणांतून 19 हजार 615 रुपये भाडे आणि 34 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच विनाबुक केलेल्या सामानाच्या 133 प्रकरणांतून 21 हजार 730 रुपये वसूल करण्यात आले.
दरम्यान, सणासुदीच्या गर्दीच्या काळात प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकीट खरेदी करावे आणि संपूर्ण प्रवासादरम्यान आवश्यक प्रवास परवानगी जवळ बाळगावी, असे आवाहन नांदेड रेल्वे विभागाने केले आहे. प्रवाशांनी गाडी सुटण्यापूर्वी पुरेसा वेळ ठेवून स्थानकावर पोहोचावे, रेल्वे कर्मचार्यांच्या सूचनांचे पालन करावे आणि तिकीट तपासणी पथकांना सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. विनातिकीट व अनियमित प्रवास रोखणे, रेल्वेच्या नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा विशेष तपासणी मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
परतूर स्थानकावर विशेष तपासणी…
10 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत परतूर रेल्वे स्थानकावर विशेष फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. परभणी तिकीट तपासणी पथकाच्या सहकार्याने झालेल्या या मोहिमेत सहा तिकीट तपासणी कर्मचार्यांनी सहभाग घेतला. तसेच एका रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचार्याने सहकार्य केले. या मोहिमेचे निरीक्षणही सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक शैलेश कुमार सिंह यांनी केले. या तपासणीदरम्यान 11 गाड्यांची तपासणी करण्यात आली. त्यात 57 प्रकरणे आढळून आली असून, 33 हजार 85 रुपयांची वसुली करण्यात आली. विनातिकीट प्रवासाच्या 44 प्रकरणांतून 5 हजार 935 रुपये भाडे आणि 22 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर विनाबुक सामानाच्या 13 प्रकरणांतून 5 हजार 150 रुपये वसूल करण्यात आले.


