परभणी, (प्रतिनिधी) : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणीच्या विद्यार्थ्यांनी ‘कलाम स्ट्रीम चॅलेंज २०२६’ या राष्ट्रीय विद्यार्थी नवोपक्रम व मॉडेल स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील ६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व ४० विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) भेटीसाठी निवड झाली आहे. एकाच महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना ही संधी मिळणे, ही परभणीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, सर्जनशीलता आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ‘कलाम स्ट्रीम चॅलेंज २०२६’ ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरली. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्ष मॉडेलच्या स्वरूपात सादर करण्याची, तांत्रिक कौशल्य विकसित करण्याची आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या संधींची ओळख करून घेण्याची संधी मिळाली.या यशामागे महाविद्यालयाचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर यांची प्रेरणा आणि प्रा. स्नेहल शेळके यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. तसेच स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी समन्वयक प्रा. जे. एन. कापसे आणि प्रा. एन. एम. बेले यांनी विशेष सहकार्य केले.
देशातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्था असलेल्या इस्रोला भेट देण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या भेटीतून अंतराळ संशोधन, उपग्रह तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयी प्रत्यक्ष माहिती मिळण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात करिअर करण्यासाठी नवी दिशा आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस श्री. सतीशभाऊ चव्हाण, सहसचिव श्री. अनिलभाऊ नखाते, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. संग्रामभैया जामकर, श्री. स्वराजसिंह परिहार व श्री. रणजित काकडे, तसेच महाविद्यालयाचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्रतिक्रिया :
“कलाम स्ट्रीम चॅलेंज २०२६ मध्ये सहभागी झालेल्या सर्व 40 विद्यार्थ्यांची इस्रो भेटीसाठी निवड होणे, हे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, कल्पकतेचे आणि तांत्रिक कौशल्याचे फलित आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर मिळवलेले हे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. या यशामुळे श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाने नवोपक्रम आणि तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. इस्रो भेटीमुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधनाची प्रेरणा मिळून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी उपलब्ध होईल.”
– संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर


