परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेत जिल्ह्याचा निकाल 89.24 टक्के लागला आहे. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांपेक्षा मुलींनी निकालात बाजी मारली आहे. तर आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 66 शाळांचा निकाल हा 100 टक्के तर 5 शाळांचा निकाल हा शून्य टक्के एवढा लागला आहे.
जिल्ह्यात इयत्ता दहावी वर्ग असलेल्या शाळांची संख्या 441 एवढी आहे. त्यापैकी 66 शाळांचा निकाल 100 टक्के एवढा लागला असून पाच शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला आहे. 90.01 ते 99.99 टक्के निकाल असलेल्या शाळांची संख्या 149, 80.01 ते 90 टक्के निकालाच्या 116 शाळा, 70.01 ते 80 टक्के निकालाच्या 52 शाळा, 60.01 ते 70 टक्के निकालाच्या 29 शाळा, 50.01 ते 60 टक्के निकालाच्या 12 शाळा, 40.01 ते 50 टक्के निकालाच्या पाच शाळा, 30.01 ते 40 टक्के निकालाच्या चार शाळा, 20.02 ते 30 टक्के निकालाची एक शाळा तर 10.01 ते 20 टक्के निकालाच्या दोन शाळा आहेत.
जिल्ह्यात विशेष प्राविण्यप्राप्त म्हणजे 75 टक्के पेक्षा अधिक गुण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या सहा हजार 925 आहे. प्रथमश्रेणी सात हजार 980, द्वितीय श्रेणीत सात हजार 622 तर दोन हजार 989 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुलींनी निकालात बाजी मारली आहे. 12 हजार 913 पैकी 12 हजार 105 मुली उत्तीर्ण झाल्या. ही टक्केवारी 93.74 टक्के आहे. तर 15 हजार 679 पैकी 13 हजार 411 मुले उत्तीर्ण झाली. ही टक्केवारी 85.53 टक्के आहे.
15 मे पासून पुर्नपरीक्षा, श्रेणीवाढ व पुर्नमुल्यांकनासाठी अर्ज सुरु…
मंडळातर्फे जुन-जुलै 2025 मध्ये होणार्या पुरवणी परीक्षेसाठी, श्रेणीसुधार व खासगीरित्या प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार (ता.15) पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. तसेच मंडळाने गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्रमुल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. ता. 14 ते 28 मे पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरता येणार आहेत.