*पैठण डावा कालवा व माजलगाव उजव्या कालव्यातून खरीप पिकांसाठी तत्काळ पाणी आवर्तन सोडणे साठी शासन अनुकूल , तात्काळ बोलावली बैठक
परभणी( प्रतिनिधी). परभणी जिल्ह्यात पावसाने ताण दिल्याने पिकांची स्थिती चिंताजनक होत असल्याने जायकवाडी धरणा मधून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आ राजेश विटेकर यांनी आज ( दि १४ जुलै) विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन या आयुधांद्वारे केली त्याची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्याच सकाळी कालवा सल्लागार समिती ची बैठक घेऊन त्यात पाणी सोडण्या बाबतचा निर्णय घेण्यात येईल असे सभागृहात जाहीर केले
आ राजेश विटेकर म्हणाले की, सध्या पावसात पडलेल्या खंडामुळे पाथरी मतदारसंघ व संपूर्ण परभणी जिल्ह्यातील शेतीची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. बऱ्याच भागात अद्याप पेरणी बाकी असून, ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे तिथे पिके टिकविण्यासाठी शेतकरी मेहनत करीत आहे. खरीप पिके तसेच ऊस वाळत आहेत. पाथरी मतदार संघातुन पैठण डावा कालवा जातो याच्या लाभक्षेत्रात ६० हजार हेक्टर जमीन येते. सद्यस्थितीत पैठण जायकवाडी धरणात ७५ % पाणीसाठा असून काही दिवसात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करावा लागणार आह. या ऐवजी या पिकांना वाचविण्यासाठी खरीप हंगामासाठी पैठण डाव्या कालव्यातून तात्काळ पाणी आवर्तन सोडण्यात यावे जाणेकरुन खरीप पिके जगतील व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
तसेच सोनपेठ तालुक्यातील माजलगांव उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील खरिप पिके देखील पावसा अभावी सुकत/वाळत आहेत. त्यामुळे माजलगाव उजवा कालव्यामधून देखील खरीप हंगामासाठी पाणी आवर्तन सोडण्यात यावे.
या दोन्ही कालव्यातून पाणी आवर्तन तत्काळ सोडण्याच्या सूचना संबंधितांना कराव्यात अशी मागणी आ राजेश विटेकर यांनी आज विधानसभेत केली होती त्यावरून जलसंपदा मंत्री यांनी दखल घेत निर्णय जाहीर केला त्यामुळे , परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी पाळ्या उपलब्ध होऊन पिकांना दिलासा देणे शक्य होणार आहे, याबदल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले