परभणी,(प्रतिनिधी) : भारतभूमीमध्ये सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांचा जन्म झाल्यामुळे भारत ही संपूर्ण विश्वासाठी पवित्र भूमी ठरली आहे. बुद्धांच्या धम्मामुळेच आज संपूर्ण जग भारताकडे आदराने पाहते आणि खर्या अर्थाने भारत हा बुद्धांमुळेच विश्वगुरू ठरला आहे. बुद्धांचा धम्म आधुनिक युगाला तारणारा असून संपूर्ण विश्वाला एकसंघ ठेवण्याची क्षमता त्यात आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील पूज्य भंते थेपवन्नीसुंथरम यांनी केले.
आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच धम्मदूत डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या पुढाकारातून परभणी तालुक्यातील मांडाखळी-उमरी परिसरातील सुवर्णभूमी बुद्ध विहार परिसरात आज गुरुवार 8 जानेवारी रोजी जागतिक धम्म ध्वज दिनानिमित्त आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत धम्मदेशना देताना ते बोलत होते. परिषदेचे उद्घाटन पूज्य भंते थेपवन्नीसुंथरम (थायलंड) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भदंत डॉ. आग्रहेरा कश्यप थेरो (श्रीलंका), भदंत काँग धम्मलोक (व्हिएतनाम), भंते शरणानंद महास्थवीर, भंते डॉ. उपगुप्त महाथेरो, भंते प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो, भंते डॉ. इंदवंश महाथेरो, भंते डॉ. धम्मदीप महाथेरो, भंते पय्यानंद थेरो, भदंत मोगलायन यांच्यासह देश-विदेशातील भिक्खू संघाची उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री (दिल्ली) राजेंद्र पाल गौतम, सिनेअभिनेते डॉ. गगन मलिक, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, श्रीलंका येथील धम्म उपासिका कौशल्य विक्रम शिंदे, थायलंड येथील अभिनेत्री मिस पावीरीसा, मिस अलिसा (ऑस्ट्रेलिया), मिस उमाफोन (थायलंड), कॅप्टन डॉ. नटकटी, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, प्रा. डॉ. भीमराव खाडे, डॉ. बी. टी. धुतमल आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी मांडाखळी येथील दहा एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य बुद्ध विहार उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. हे विहार जागतिक स्तरावर बौद्ध बांधवांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असे ते म्हणाले. बौद्ध धम्माचा विचार कृतीतून व आचरणातून आत्मसात केल्यास समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरवर्षी 8 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय धम्म परिषद मोठ्या प्रमाणावर आयोजित केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
परिषदेतील मान्यवरांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेचे कौतुक करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व भिक्खू संघांची धम्मदेशना संपन्न झाली. कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील तुरुकमाने यांनी केले तर आभार राहुल वाहिवळ यांनी मानले. सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या प्रख्यात गायिका कडुबाई खरात यांच्या भीमगीत संगीत रजनीने कार्यक्रमाची सांगता झाली.
50 फूट उंच धम्म ध्वजाचे ध्वजारोहण…
परिषदेच्या प्रारंभी भिक्खू संघाच्या हस्ते 50 फूट उंच धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या उपासक-उपासिकांनी पुष्पवृष्टी करून भिक्खू संघाचे स्वागत केले. भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलनाद्वारे परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिशरण पंचशील प्रदान केले.


