*- ग्रंथदिंडीला वाचकप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*- पुस्तक खरेदीसाठी गर्दी*
*- 17 मार्चला ग्रंथोत्सवाचा समारोप*
परभणी, (प्रतिनिधी) – शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जसे रक्त अत्यावश्यक असते, तसेच मेंदूला चैतन्यशील ठेवण्यासाठी ग्रंथांची साथ आवश्यक असते. वाचनामुळे विचारांना दिशा मिळते, ज्ञानाची कक्षा विस्तारते आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. त्यामुळे प्रत्येकाने नियमित वाचनाची सवय लावणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
तर, काळानुसार नवे तंत्रज्ञान येतच राहणार; मात्र त्या बदलत्या वातावरणातही वाचनाचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. कारण वाचन माणसाला विचारांनी समृद्ध करते, ज्ञानाची दारे उघडते आणि व्यक्तिमत्त्वाला उंची देते. समाजात वाचन संस्कृती दृढ करण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनाल आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी शहरातील वसमत रोडवरील जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या परिसरात आज दोन दिवसीय परभणी ग्रंथोत्सवाचे उदघाटन प्रा. भालेराव यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी श्री. चव्हाण हे उपस्थित होते.
कार्यक्रमास जेष्ठ कवी केशव वसेकर, प्रसिध्द कथाकर राजेंद्र गहाळ, डॉ. धर्मराज वीर, सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, कार्यालय अधीक्षक अनिल बावीस्कर, परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जीवन लोखंडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालासाहेब देवणे आदींसह मोठया संख्येने वाचकप्रेमी, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने ग्रंथोत्सवाचे उदघाटन झाले. तसेच फित कापून पुस्तकांच्या स्टॉलचे उदघाटन करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, मोबाईलमुळे वाचनाचे माध्यम बदलले असले तरी वाचकांची संख्या कमी झालेली नाही. मात्र काय वाचावे, याचे मार्गदर्शन आजच्या नव्या पिढीला होणे खूप गरजेचे आहे. मोबाईल केवळ मनोरंजनाचे साधन व्हायला नको. त्यात एआयमुळे आता नवे आव्हान उभे ठाकले आहे. या तंत्रामुळे उत्तरे सहज मिळत असले तरी नव कल्पना आणि संशोधनासाठी मानवी मेंदुला सक्रीय ठेवणे कठीण होत आहे. जर मनाच्या आणि मेंदुच्या नैसर्गिक जाणीवा शाबुत ठेवायच्या असतील तर वाचन हे आवश्यकच आहे. शिवाय उपवासाप्रमाणे कोणताही एक पूर्ण दिवस मोबाईल आणि लॅपटॉपपासून स्वत:ला दूर ठेवून वाचनासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणेही गरजेचे आहे. आपले मराठी साहित्य खूप दर्जेदार आहे, आपली भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी हे साहित्य नव्या पिढीने जरुर वाचावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
प्रा. भालेराव पुढे म्हणाले की, ग्रंथ हे केवळ माहितीचे साधन नसून ते माणसाला विचारशील, संवेदनशील आणि संस्कारित बनविण्याचे माध्यम आहे. समाजात वाचन संस्कृती वाढावी, विशेषतः तरुण पिढीने पुस्तकांशी मैत्री करावी, यासाठी ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले. आजच्या सोशल मिडियाच्या काळातही ग्रंथांचे महत्त्व कमी झालेले नाही. वाचनाचे माध्यम जरी बदलले असले तरी वाचकसंख्या कमी झाली नाही. मात्र, जो खरा वाचक आहे, तो आवर्जुन पुस्तक वाचतोच. वाचनामुळेच जगात अनेक महान व्यक्ती घडल्या आहेत. वाचाल तर वाचाल आणि ग्रंथ हेच गुरु या प्रेरणादायी वाक्यांचा अंगीकार करुन वाचनसंस्कृती टिकविणे महत्वावाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. शेवटी “ग्रंथ माझे गुरु, ग्रंथ माय-बाप” या आपल्या प्रसिध्द कवितेने त्यांनी मनोगताचा समारोप केला.
प्रास्ताविकात श्री. हुसे यांनी ग्रंथोत्सवाचे महत्त्व विषद केले. तसेच “दु:खाचा करी अंत, एक ग्रंथ-एक संत” या आपल्या कवितेतून ग्रंथाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक कल्याण वसेकर यांनी केले. प्रारंभी गंगाखेड येथील कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थींनी सुंदर असे स्वागतगीत गायले.
*ग्रंथदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद*
ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीला नागरिक, विद्यार्थी आणि पुस्तकप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिंडीमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक तसेच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
परभणी शहरातील राजगोपालचारी उद्यान येथून ग्रंथदिंडीचा शुभारंभ झाला. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसिध्द कथाकार राजेंद्र गहाळ, शिक्षणाधिकारी (मा) डॉ. सविता बिरगे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे, सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालासाहेब देवणे आदी उपस्थित होते.
ग्रंथ दिंडीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वाचनाची गोडी वाढविण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
*17 मार्चला विविध कार्यक्रम व समारोप*
मंगळवार, दि. 17 मार्च रोजी सकाळी 11.00 वा. प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित परिसंवाद कार्यक्रमात डॉ. अशोक कोलंबीकर, सुभाष ढगे, जीवन लोखंडे यांचा सहभाग राहणार आहे. सामाजिक जीवनात ग्रंथालयांचे महत्त्व हा परिसंवादाचा विषय आहे.
दुपारी 2.30 वा. जेष्ठ कवी केशव वसेकर यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन होणार आहे. दुपारी 4.00 वा. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, प्राचार्य राहूल नितनवरे हे उपस्थित राहणार आहेत.
*वाचनप्रेमींना पुस्तकं खरेदीची संधी*
ग्रंथोत्सवात विविध प्रकाशनांच्या पुस्तकांच्या स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील वाचनप्रेमींना विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके एकाच ठिकाणी पाहण्याची व खरेदी करण्याची संधी आहे.
या ग्रंथोत्सवाचा लाभ परभणी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक आणि वाचनप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. देवणे यांनी केले आहे.
***


