परभणी (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात एक अत्यंत चिंताजनक कल समोर आला आहे. पूर्वी केवळ ६०-७० वर्षांच्या व्यक्तींमध्ये आढळणारा हृदयविकार आता चाळीशीतच तरुणांना गाठत आहे. सिद्धार्थ शुक्ला, पुनीत राजकुमार आणि गायक केके यांसारख्या फिट सेलिब्रिटींच्या अकस्मात निधनाने हा धोका अधिक स्पष्ट झाला आहे.या पार्श्वभूमीवर, आ.डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून परभणीतील आर.पी. हॉस्पिटलने अवघ्या ३०० रुपयांत TMT (ट्रेडमिल टेस्ट) उपलब्ध करून दिली आहे.
‘कार्डिओ मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट’च्या आकडेवारीनुसार, हृदयविकाराच्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण ४० वर्षांखालील आहेत.
बदलेली जीवनशैली, कामाचा ताण, अपुरी झोप, जंक फूड आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकदा वरून तंदुरुस्त दिसणाऱ्या व्यक्तींनाही अचानक हृदयविकाराचा झटका येतो. याचे मुख्य कारण म्हणजे अंतर्गत समस्या वेळीच निदान न होणे.
TMT चाचणी ही हृदयाची खरी अग्निपरीक्षा आहे
केवळ सामान्य ECG ने हृदयाच्या सर्व समस्या समजत नाहीत. TMT चाचणीत रुग्णाला ट्रेडमिलवर चालवून हृदयावर नियंत्रित दबाव टाकला जातो. यामुळे: विश्रांतीच्या अवस्थेत न दिसणारे अडथळे (Blockages) स्पष्ट होतात. तसेच भविष्यातील हार्ट अटॅकची पूर्वसूचना मिळते. आणि या मुळे वेळेवर उपचार करून जीव वाचवता येतो.
आर.पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगितले की, “परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, तरुण, वृद्ध, महिला आणि पुरुष यांच्यात हृदयविकाराच्या वाढत्या धोक्याला रोखण्यासाठी आणि वेळेवर उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.”
हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. दीपक कुबडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सलाम तांबोळी, डॉ. शहाजी बोडखे, डॉ. संतोष हारकळ आणि डॉ. दैठणकर यांची अनुभवी टीम सतत कार्यरत आहे. या अत्याधुनिक सुविधेमुळे आता परभणीकरांना छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई-पुण्याला जाण्याची गरज उरली नाही.
छातीत तीव्र वेदना, दडपण किंवा जळजळ. चालताना किंवा पायऱ्या चढताना धाप लागणे मान, जबडा, खांदा किंवा डाव्या हातात वेदना, अचानक खूप घाम येणे किंवा चक्कर येणे. ही मुख्य लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य तो उपचार घेणे असे आवाहन आर.पी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.


