परभणी( प्रतिनिधी) ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणात जलद गतीने तपास करून परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी परभणीतील सर्व पत्रकारांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
परभणीतील ज्येष्ठ पत्रकार श्री विजयकुमार मुंदडा यांचा दिनांक पाच मे रोजी वसमत रोडवर श्री शिवाजी विधी महाविद्यालय समोरील गोल्डन बेकरी परिसरात अपघातात मृत्यू झाला. या दुचाकी चालकांनी भरधाव व निष्काळजीपणाने दुचाकी चालवून मुंदडा यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात नवा मोंढा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या घटनेचा योग्य रीतीने तपास होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेत कलम 106/02 याप्रमाणे हीट अँड रनचा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. या गुन्ह्यात कलम वाढ करून आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी पोलिसांनी तात्काळ तपास करावा अशी मागणी सोमवारी (दि.11) करण्यात आली.
पोलीस अधिक्षक पंकज कुमावत,निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी,महापालीका आयुक्त नितीन नार्वेकर यांची पत्रकारांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.विजयकुमार मुंदडा यांच्या अपघात प्रकरणात कलम 106/02 चा समावेश व्हावा,अपघात प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्याची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करावी,वसमत रोडवर श्री शिवाजी महाविद्यालय, तलाठी कार्यालय, शिवशक्ती बस स्टॉप,विद्यापीठ गेट,खानापुर फाटा या ठिकाणी गतिरोधक बसवावेत,वसमत रोडवरील दोन्ही बाजूची अतिक्रमणे हटवावीत, शहरातील प्रमुख रस्ते व रहदारीच्या रस्त्यांवर सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करावी. वर्षानुवर्षे धूळ खात पडलेले शहरातील सर्व प्रमुख मार्गांवरील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावे,वसमत रोडवर तलाठी कार्यालय परिसरात उभ्या राहणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसेसना उभे राहण्यास मनाई करावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी निवेदनावर प्राचार्य सुरेश नाईकवाडे,विशाल माने, कैलास चव्हाण,विजय कुलकर्णी,लक्ष्मीकांत रासवे,शिवशंकर सोनुने,राजकुमार हट्टेकर,डॉ.धनाजी चव्हाण,ज्ञानेश्वर उंडाळ,नरहरी चौधरी, लक्ष्मण मानोलीकर,अरुण रणखांबे,विशाल मुंदडा,बालासाहेब काळे,राजन मंगरुळकर, दिलीप बोरुळ,दिवाकर माने,संतोष मगर, मारोती जुंबडे,संजय बगाटे,मोईन खान,डॉ.आर.एल देशमुख,अनिल दाभाडकर,दत्तात्रय कराळे,सुधीर बोर्डे,विष्णु सायगुंडे,पांडुरंग दुधाटे,विलास काळे,रियाज कुरेशी,राहुल डोंगरे,गजानन साबळे,डागा शेठ,बाळु घिके आदी उपस्थित होते.


