जगात काही माणसं अशी असतात की ज्यांच्या जीवनसंघर्षातून घडलेली प्रेरणादायी यशोगाथा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरते. असेच आमच्या शारदा महाविद्यालयातून अठ्ठावीस वर्षाची सेवा देऊन निवृत्त होत असलेले कार्यालयीन अधीक्षक श्री सुरेश नारायणराव जयपूरकर…
त्यांचे मुळ गाव जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील जयपूर एक शेतकरी कुटुंब. कोरडवाहू निसर्गावर आधारित शेती त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बेताची.आई अशिक्षित व वडीलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण.परंतु कुटुंबातील वडिलांचे भाऊ उच्चशिक्षित होते. कुटुंबात तीन बहिणी १मोठी व २ लहान आणि स्वतः अशी चार भावंडे. तीन बहिणीमध्ये एकुलता एक भाऊ म्हणून जबाबदारीची जाणीव लहानपणापासूनच. अशा परिस्थितीत जन्माला आलेले सुरेश जयपूरकर यांनी आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी मात्र मोठी ठेवली.
जयपूर येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असताना आईची एकच इच्छा होती; ती म्हणजे “मुलाने शिकून मोठं व्हावं.” नोकरी करावी परंतु वडिलांची अपेक्षा याच्या उलट होती.कोरडवाहू का असेना परंतु आपल्या मुलाने शेती करावी व कुटुंबाला हातभार लावावा.परंतु आईचा शब्द प्रमाण मानून मोठ्या जिद्दीने सुरेशरावांनी शिक्षणाचा मार्ग निवडला. शिक्षण घेत असताना त्यांना काकांचे पाठबळ मिळाले. या मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व. गणपतराव जयपूरकर व लेखक स्व. गंगाधरराव जयपूरकर यांचा उल्लेख करणे अगत्याचे ठरते .बिकट परिस्थितीत शिक्षण घेत असतानाही सुप्त कलागुणांना मात्र कोमेजू दिले नाही.त्यांनी वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करत महाविद्यालयाला अनेक बक्षिसे मिळवून दिली.त्यासोबतच त्यांनी केवळ अभ्यासच नाही, तर विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला.शिस्त, नेतृत्व आणि संघटन कौशल्य आत्मसात करण्यात महाविद्यालयातील जे जे उपक्रम उपकारक ठरतात त्यातील राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी.मध्ये सक्रिय सहभाग घेत ‘सी’ प्रमाणपत्र मिळविले. महाविद्यालयीन जीवनात अनेक चळवळी व सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेत सतत इतरांना मदतीची भावना आणि सहकार्याची वृत्ती ही त्यांची ओळख बनली.
आई-वडिलांच्या आजारपणामुळे जबाबदाऱ्या वाढल्या, आर्थिक अडचणी आल्या. तरी परंतु त्यांनी आपले शिक्षण थांबवले नाही. पुढे एम कॉम करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर व पूर्वाश्रमीच्या औरंगाबादला जावे लागले.येथे एम.कॉम.चे शिक्षण घेताना ‘कमवा व शिका’ योजनेत काम त्यासोबतच एल . आय.सी ची मध्ये तात्पुरत्या स्वरूपात सहा महिने नोकरी केली.त्यानंतर औरंगाबाद येथील नामांकित हॉटेल अजिंठा ॲम्बेसेडर येथे नोकरी स्वीकारली. म्हणजे अनेक अडथळ्यांचा सामना करत शिक्षण पूर्ण केले.
जिथे नोकरी करत होते तेथील हॉटेल राहण्याच्या ठिकाणापासून दूर असूनही केवळ शिक्षणात खंड पडू नये म्हणून सायकलवर जाणे येणे करीत जिद्दीने नोकरी केली. त्यांच्या जीवनातील ही घटना अत्यंत महत्वाची असून ती त्यांच्या जिद्दीचे प्रतीक आहे.
शिक्षण घेत असतानाच घराला हातभार लागावा म्हणून छोटे व्यवसाय सुरू करून घर चालवत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
ज्येष्ठ पत्रकार मा. विजय जोशी सर यांच्या मार्गदर्शनातून व सहकार्याने पत्रकार म्हणून दै.तरुण भारत व देवगिरी समाचार या हिंदी आवृत्तीमध्ये काम करत समाजातील प्रश्न मांडले. पुढे स्व. हेमराजजी जैन (भाईजी)यांच्या पुढाकारातून शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याची संधी प्राप्त झाली. मुख्य लिपीक म्हणून कार्य करत प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा जपली.
कष्टाविना फळ नाही असे आपले आचरण राहिले आहे. स्व. हेमराजजी जैन (भाईजी) यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून महाविद्यालयाच्या जडणघडणीत व विकास कामात आपला सिंहाचा वाटा राहिला आहे.
संस्थेने व प्राचार्यांनी एखाद्या कामाची जबाबदारी आपल्यावर सोपवली असता ते काम पूर्ण करूनच थांबणे हा आपला स्थायी स्वभाव त्यामुळे संस्थाचालक प्राचार्य प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांची मने आपण जिंकली. आज पर्यंतची सर्व अभिलेखे व्यवस्थित मांडणी करून ठेवली आहे. कोणतीही माहिती अचूकपणे सापडेल अशी अभिलेखांची व्यवस्था पाहून आपल्या कार्य कौशल्याची जाणीव होते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद प्रशासकीय कर्मचारी, अभ्यागत व विद्यार्थी यांच्याशी असणारा आपला सुसंवाद हा आपल्या प्रेमळ स्वभावाची जाणीव करून देतो तर कधी आवश्यकतेनुसार कठोर भूमिका घेऊन आपल्या स्वभावातील शिस्तप्रियतेची अनुभूतीही देतो.
आपल्या कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक सेवेमुळे संस्थेस अनेक मानांकन प्राप्त झाली आहेत.तसेच आपल्या कार्यातून आपण संस्थेचा नावलौकिक वाढविण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.
तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण नेहमी पुढे राहिलात दुःखद प्रसंगी धावून जाणे हा आपला स्वभाव निश्चितच वाखाण्याजोगा आहे.
अजातशत्रू व्यक्तिमत्व असल्या कारणाने आपला खूप मोठा मित्रपरिवार आहे आणि या मित्रपरिवार परिवाराची देखील आपणास वेळोवेळी अनमोल साथ लाभली आहे.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाची वाट सोडू नये; संघर्ष हा यशाचा पाया असतो.जबाबदाऱ्या न टाकता त्या स्वीकारून पूर्ण केल्या पाहिजेत. हा विचार मनाशी घट्ट धरून सकारात्मक विचाराने आपण वाटचाल केलीत.
शिस्त, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच खरे भांडवल आहे.अत्यंत साध्या कुटुंबातून, प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहून समाजात आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणारे सुरेश जयपूरकर हे खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांचा जीवन प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.
आपण एक निष्ठेने प्रामाणिकपणाने महाविद्यालयात 28 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतरही प्रसन्न आनंदी भावमुद्रेने सेवेतून निवृत्त होत असताना अत्यंत कृतज्ञ भावनेने आपणास पुढील आयुष्य सुखी समाधानी निरोगी व दीर्घायु लाभो ही सहृदयी भावना.
व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
प्रवीण मनोहर सोनोने
शिक्षक समुपदेशक,बाल विद्यामंदिर, हायस्कूल, परभणी
प्रा. डॉ. सच्चिदानंद फुलचंद खडके
मराठी विभागप्रमुख
शारदा महाविद्यालय, परभणी


