पेडगाव ता.परभणी येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण शिबिरात केले प्रतिपादन .
परभणी (प्रतिनिधी) मा कुलगुरू इंद्रमणी यांचे मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेद्वारे पेडगाव ता.जि. परभणी येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिरात परिसरातील संत्रा, कागदी लिंबू, केळी व भाजीपाला उत्पादक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने बीज प्रक्रिया, जैविक खते आणि सेंद्रिय खते , विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये युक्त खते या निविष्ठांचा एकात्मिक खत व्यवस्थापन यासाठी वापर करण्यासंदर्भात डॉ. हरिहर कौसडीकर,उपसंशोधन संचालक आणि विभाग प्रमुख मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग यांनी मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष बागे मध्ये प्रात्यक्षिका द्वारे शेतकऱ्याना भेडसावत असलेल्या विविध जमिनीचे आरोग्य व पीक पोषण संदर्भातील समस्यांचे निराकरण देखील केले. मृदविज्ञान विभागातील दीर्घकालीन खतप्रयोग योजनेचे प्रमुख डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि प्रशिक्षण शिबिर याबद्दलची प्रस्तावना आणि मार्गदर्शन केले. तसेच रासायनिक खत वापराचा जमिनीवरील परिणाम आणि पिकांची उत्पादकता या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच रासायनिक खतांचा संतुलित व कमी वापर, माती परीक्षण, जैविक खतांचा वापर जमिनीचे आरोग्य याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. कौसडीकर यांनी केले.

या प्रशिक्षण शिबिरात विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये खते, सेंद्रिय खते व जैविक खतांच्या वापराबद्दल केवळ महत्त्वच विशद केले नाही तर प्रतिनिधीक स्वरूपात विविध शेतकऱ्यांना विद्यापीठाद्वारे उत्पादित जैविक खत एनपीके कन्सोरशियम , सूक्ष्म अन्नद्रव्ये युक्त आणि विद्राव्य खतांचे चे वितरण देखील करण्यात आले. यासोबतच माती परीक्षण , विद्राव्य खते , सूक्ष्म अन्नद्रव्ये व जैविक खताचा वापर कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात करावा या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक देखील करण्यात आले. पेडगाव ता. परभणी परिसरातील सर्व उपस्थित शेतकऱ्यांना विद्यापीठातील सेवा आणि उपलब्ध निविष्ठा याविषयी माहिती देऊन शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या जास्तीत जास्त संपर्कात राहावे असे आवाहन डॉ. कौसडीकर यांनी केले. शेतकरी प्रशिक्षण शिबिर श्री विजय गंगाधर जंगले यांचे शेतावर आयोजित करण्यात आले होते.
शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आणि विविध फळझाडे व पिकासंदर्भात असलेल्या पीक पोषण विषयक समस्यांचे निराकरण करून घेतले. यामध्ये पारधी बाळासाहेब आनंदराव , राजेश्वर सिताराम शिंदे , कुलदीप जगदीश राव देशमुख
, राजेश दिलीपराव देशमुख ,अर्जुन मुंजाभाऊ शिंदे , आप्पाराव गायकवाड , चंद्रकांत किशनराव देशमुख , संजय ठोंबरे, रमेश बापूराव पारधी , विजय गंगाधर जंगले , चंद्रकांत किशनराव देशमुख , कृष्णा मुकुंदराव घुले व इतर शेतकरी उपस्थित होते.


