दोन दिवसीय कृषी महात्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन*
परभणी, (प्रतिनिधी) : भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित असून ग्रामीण भागाच्या विकासात शेतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या काळानुसार शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक पद्धती, तंत्रज्ञान व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत शेती अधिक उत्पन्नक्षम बनवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 तसेच अन्न आणि पोषण सुरक्षा पौष्टिक तृणधान्य 2026 निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वैद्यनाथ वसतिगृह शेजारील मैदानात आयोजित जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते.

यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार) डॉ. राकेश अहिरे, संचालक (संशोधन) डॉ. खिजर बेग, हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे, महाबीज विभागीय व्यवस्थापक जे.आर. खोकड, महाबीज जिल्हा व्यवस्थापक एम.आर.शेख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, शेती करताना शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता आधुनिक व नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन वाढीस मदत होईल व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. तसेच आधुनिक शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायाकडे वळल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल.
यावेळी डॉ. अहिरे यांनी कृषी विद्यापीठाच्या नवीन वाणाविषयी माहिती दिली. या वाणामुळे शेती उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे त्यांनी नमूद करीत शेतीमाल विक्रीबाबत मार्गदर्शन केले.
महोत्सवात सुधारित पीक वाण, मृदा परीक्षण, सेंद्रिय शेती, जलसंधारण, पशुपालन, दुग्धव्यवसाय, कृषी प्रक्रिया उद्योग आदी विविध कृषी विषयक स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच कृषी प्रदर्शन, धान्य महोत्सव, पौष्टिक तृणधान्य प्रदर्शन, परिसंवाद व चर्चासत्र, तसेच उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी तसेच शेतीतील उत्पादनवाढीसाठी विविध नवकल्पना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळावी या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी प्रास्ताविकात केले. सुत्रसंचलन तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांनी केले.
यावेळी 29 प्रगतीशील शेतकरी व महिला शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कृषी विभागाच्या विविध माहिती पुस्तकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी विविध स्टॉलला भेट देऊन विक्रेत्यांशी संवाद साधला.
या महोत्सवात एकूण 40 स्टॉल लावण्यात आले असून जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचा यामध्ये सक्रिय सहभाग आहे. महोत्सवाला शेतकरी, महिला शेतकरी व नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.
*-*-*-*-*


