परभणी( प्रतिनिधी) विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान दिल्लीशी सलग्न विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्था आयोजित परभणी शाखेच्या वतीने दहा दिवसीय शिशु वाटिका आचार्य प्रांत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन राजे संभाजी गुरुकुल गंगाखेड रोड परभणी येथे दि.३ रविवार रोजी झाले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून झाली.

याप्रसंगी विद्याभारती देवगिरी प्रांत चे उपाध्यक्ष श्री प्रकाश पोतदार यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्र उभारणीत शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन यावेळी श्री पोतदार यांनी केले. विद्याभारती हे जगातील शिक्षण क्षेत्रात काम करणारे असरकारी परंतु असर-कारी असे संघटन असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. नराचा नारायण पर्यंत तर नारी तू नारायणी तसेच बालकाचा देवत्वापर्यंत प्रवासासाठी ‘सा विद्या या विमुक्तये’ असे ब्रीद घेऊन विद्याभारती शिक्षण क्षेत्रात काम करीत आहे. शिक्षण क्षेत्रात भारतीयत्व हे वैशिष्ट्य घेऊन विद्याभारती काम करते. विद्याभारती देशातील सर्वच प्रांतामध्ये काम करते. आज देशभरात विद्याभारतीच्या पंचवीस हजार शाळा आणि त्या शाळेमधून एक लाख २५हजार शिक्षक तर सात लाख ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशी माहिती त्यांनी दिली. विद्याभारती हे १९५२ मध्ये कुरुक्षेत्र येथे प्रारंभ होऊन आज हे संघटन देशभर काम करीत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याभारती देवगिरी प्रांत चे अध्यक्ष डॉ. विवेक काटदरे हे होते.
व्यासपीठावर सौ. सुरेखाताई सोनार या उपस्थित होत्या. प्रांत संघटन मंत्री श्री शैलेश जोशी यांनी यावेळी शिक्षार्थी आचार्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण वर्गात देवगिरी प्रांतातून शिशु वाटिका आचार्य सहभागी झाले आहेत. विद्याभारतीच्या वतीने दहा दिवसीय शिशुवाटिका आचार्य प्रशिक्षण वर्ग नियमितपणे २००२ पासून आयोजित केला जातो. याच प्रशिक्षणादरम्यान वैदिक गणित प्रशिक्षण, कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आलेला आहे. दि. १३ मे पर्यंत हे प्रशिक्षण राजे संभाजी गुरुकुल गंगाखेड रोड, परभणी येथे चालणार आहे. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी विद्याभारती शाखा परभणीचे जिल्हाध्यक्ष श्री सुभाष चलवदे, जिल्हा मंत्री श्री शिरीष संघई, श्री प्रताप देशपांडे, श्री.शिवाजी आरळकर,श्री. अभय हट्टेकर, श्री चंद्रशेखर कुलकर्णी, श्री विकास येस्के, श्री संतोष चिद्रवार, श्री प्रशांत डाफणे, श्री गणेश लोखंडे, सौ. अभिलाषा संघई आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


