परभणी,(प्रतिनिधी) : सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या झरी परिसरातील शेतकर्यांच्या कर्जप्रश्नावर खा संजय जाधव यांनी झरी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला भेट देऊन बँक प्रशासनाशी चर्चा केली. शेतकर्यांना कर्जासाठी वारंवार बँकेच्या फेर्या माराव्या लागू नयेत, उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे कर्जप्रकरणे तातडीने निकाली काढावीत आणि कर्ज पुनर्गठनाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अदंडचणीत सापडले असून, आगामी शेती हंगामासाठी त्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत कर्जप्रक्रियेत अनावश्यक अडथळे निर्माण होऊ नयेत, याकडे खासदार जाधव यांनी बँक अधिकार्यांचे लक्ष वेधले. सातबारा उतार्यावर काही बोजा असल्यास त्याबाबत योग्य विचार करून पात्र शेतकर्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकरी आधीच दुष्काळामुळे त्रस्त आहे. कर्जासाठी त्याला वारंवार बँकेत बोलावून त्रास देऊ नका. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे आवश्यक कार्यवाही करून कर्जप्रकरणे तातडीने मार्गी लावा, अशी भूमिका खासदार संजय जाधव यांनी मांडली. शेतकर्यांना वेळेत कर्ज मिळाल्यास आगामी हंगामाच्या तयारीसाठी मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे प्रलंबित कर्जप्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
याशिवाय केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभ परिसरातील ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी बँक अधिकार्यांनी शेतकर्यांच्या अडचणींबाबत सकारात्मक भूमिका घेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. या वेळी शिवसेनेच्या सोनल देशमुख, इंजिनीयर होगे पाटील, विशाल देशमुख, ब्रह्मानंद सावंत, दिलीपराव देशमुख, गोपाळ देशमुख, अभिजित देशमुख, बबन महाराज मठपती, कैलास अग्रवाल, घुले पाटील, योगेश शिरडकर, राहुल यादव, बाळासाहेब देशमुख, किरण देशमुख, आबा चौधरी, संतोष देशमुख, कृष्णा राऊत दूधगावकर, पुष्पक देशमुख यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.


