परभणी,( प्रतिनिधी) : मुलींवरती अत्याचारांचे प्रसंग वाढत आहे त्याकरिता बरीच कारणे जरी असेल तरी महत्त्वाचे कारण म्हणजे तुम्ही नाही म्हणत नाही व त्याचाच फायदा समाजातील दुष्कर्म व्यक्ती द्वारे घेतला जातो. त्यामुळे योग्य वेळेस सुरुवातीलाच मनाच्या इच्छे विरुद्ध होणाऱ्या गोष्टीला नाही म्हटले पाहिजे म्हणून “नाही म्हणणे शिका”असे मार्गदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश भूषण एम. काळे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम . सादरानी यांच्या मार्गदर्शनानुसार अनुसूचित जाती मुलींचे शासकीय निवासी शाळा ,मानवत तालुका मानवत जिल्हा परभणी येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी न्या.भूषण काळे बोलत होते.
यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह मानवत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वस्तीगृह, मानवत व अनुसूचित जातीचे मुलींचे शासकीय निवासी शाळा मानवत येथील विद्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, महिलांसाठी असलेले कायदे तसेच विविध फौजदारी कायद्यांची माहिती देण्यात आली. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मिळणाऱ्या मोफत विधी सेवा आणि त्यासाठीच्या पात्रतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
न्या. भूषण काळे यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे शिक्षण आणि त्यातील करिअरच्या संधींबाबतही माहिती दिली. वकील, न्यायिक सेवा आणि कायदे क्षेत्रातील विविध रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महिला, अनुसूचित जाती-जमातीतील नागरिक तसेच वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पात्र व्यक्तींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत कायदेशीर मदत मिळू शकते. नागरिकांना कायदेविषयक अडचणी आल्यास त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी येथे संपर्क साधावा. तसेच विधी सेवा मिळविण्यासाठी १५१०० या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजू एडके यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियानाची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अंजनीकर साहेब यांनी दिली व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री घुगे सर ,श्री शिंदे सर, श्रीमती भोसले मॅडम ,श्रीमती ठाकूर मॅडम व संबंधित कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
***


