परभणी (प्रतिनिधी)
भगवंताच्या मनातील विचार म्हणजे गीता आणि भगवंताने सांगितलेले विचार म्हणजे ज्ञानेश्वरी असून गीता हा सर्व धर्मग्रंथांचा सार असल्याचं प्रतिपादन ह भ प केशव महाराज उखळीकर यांनी केले.
येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळातर्फे मराठवाड्याचे लोकनेते माजी मंत्री माजी खासदार गणेशराव दुधगावकर जागतिक वत्कृत्व स्पर्धा अंतिम फेरी व बक्षीस वितरण कार्यक्रम 6 ऑक्टोबर रविवार रोजी आयोजित करण्यात आला होता, यावेळी उखळीकर महाराज बोलत होते.
परभणी ही अध्यात्मिकरित्या जागतिक कीर्तीचे शहर असून वारकरी संप्रदायाचे प्रसारक संत नामदेव आणि संत जनाबाईंनी याच भूमीत जन्म घेतला आहे असेही उखळीकर म्हणाले. जो धर्माला सोडेल तो या जगात टिकणार नाही जो धर्माला धरून राहील तोच मोक्षाला पोहोचेल असे मतही त्यांनी मांडले.
यावेळी या उपक्रमाचे संकल्पक, मंडळाचे सहसचिव तथा श्रीमदभगवदगीता अभ्यासक समीर दुधगावक यांनी बोलताना गीतेतील विविध श्लोकांच्या आधारे मौलिक असे मार्गदर्शन केले. धर्मातील कर्मकांड सोडा, काम क्रोध मोह याचा त्याग केल्याशिवाय तरणोपाय नाही, ध्यानातूनही मोक्ष कसा साधता येतो, पूजा केवळ प्रज्ञावंतांचीच करावी, आदी विविध विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी व्यासपीठावर स्पर्धा परीक्षक स्त्रीरोग तज्ञ डॉ.दत्तात्रय मगर, हृदयरोग तज्ञ डॉ. गोविंद रसाळ, वेदांत कोविद प्रमोद शास्त्री कुलकर्णी, आयुर्वेदाचार्य डॉ. रत्नाकर लोंढे ,ह भ प राम महाराज पिंपळेकर, ह भ प किशोर महाराज बुरंगे यांची तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. शेख मो.बाबर, प्राचार्य डॉ.श्रीधर भोंबे, भानुदासराव शिंदे, शेषेराव मोहिते, सरपंच अजित गोरे यांची उपस्थिती होती.
मंडळाचे सहसचिव तथा श्रीमदभगवदगीता अभ्यासक समीर दुधगावकर यांच्या संकल्पनेतून आयोजित केल्या जाणाऱ्या या जागतिक स्पर्धेत गुजरात, मध्यप्रदेश येथील नागरिकांनी तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.या वर्षीच्या स्पर्धेसाठी “श्रीमदभगवदगीता अध्याय अठरावा व श्लोक 66 चा नेमका अर्थ काय?” हा विषय निश्चित करण्यात आला होता.
तज्ञ व्यक्तींकडून दोन फेरीत निवडण्यात आलेल्या स्पर्धकांच्या अंतिम निवड प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष पद्धतीने वक्तृत्वाचे सादरीकरण यावेळी झाले. या स्पर्धेमध्ये तीस वर्षाखालील गटात डीजीवीर म्हणून हर्षदा बाबुराव हत्तीअंबिरे यांचा गौरव करण्यात आला त्यांच्या व्हिडिओला एकूण 40,000 veiw होते. या गटातील उत्तेजनार्थ पारितोषक रोख 11 हजार रुपये कोमल मुकुंद कोठावदे यांना, द्वितीय पारितोषक रोख 31 हजार रुपये प्रतीक संतोष पाटील यांना तर 51000 चे प्रथम पारितोषक यशकुमार अशोक मुंडे यांना मिळाले. तीस वर्षावरील गटात उत्तेजनार्थ बक्षीस पूजा नंदकिशोर शेवतकर यांना, द्वितीय पारितोषक तथा डीजीवीर पुरस्कार विष्णू गुलाब ठोंबरे यांना तर प्रथम पारितोषक शंकर माधवराव आजेगावकर यांनी पटकावले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
तीन सत्रात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि. समीर दुधगावकर यांनी, सूत्रसंचालन उपप्राचार्य विजय घोडके, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रो.डॉ. भीमराव खाडे, व मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक राजेश तलवारे यांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्ञानोपासक शिक्षण मंडळातील सर्व कर्मचारी , विद्यार्थी, तसेच गीता प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————