सेलू,(प्रतिनिधी) : तालुक्यातील रवळगाव येथील मूळ रहिवाशी तथा मावळ तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी शिल्पा रोडगे यांची जागतिक ख्यातीच्या नासा दौर्यासाठी निवड झाली आहे. या यशामुळे रवळगावच्या नावलौकिकात भर पडली आहे.
शिल्पा रोडगे या मूळच्या रवळगाव (ता.सेलू) येथील असून, सध्या मावळ तालुक्यात गटशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, त्यांना अंतराळ संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी त्या सातत्याने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठेच्या दौर्यासाठी निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत जिद्द, मेहनत आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या दौर्यासाठी निवड होणे, ही उल्लेखनीय बाब मानली जात आहे. रोडगे यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांचा हा दौरा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह मुलींनाही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती साकार करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारा ठरणार आहे.



