परभणी,(प्रतिनिधी) : बोरवंड या रस्त्यावर उमरी फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असणार्या एका टिप्परवर कार आदळल्याने झालेल्या अपघातात परभणीतील शेळके दांपत्याचा मृत्यू झाला होता. त्यात घटनेत गंभीर जखमी रितीक्षा शेळके हीच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दुर्देवाने, सोमवारी सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास तीचा मृत्यू झाला.
परभणी येथील मध्यवस्तीतील गांधी पार्कतील रोहित दिलीपराव शेळके (वय 38) व माधवी रोहित शेळके (वय 35) हे दोघे दांपत्य शनिवारी मुलगीसह ब्रम्हपुरीला गेले होते. तेथून ते कारने रात्री परतत होते. त्यावेळी उमरी फाट्याजवळ रस्त्यावरच उभ्या असणार्या टिप्परवर कार मागच्या बाजूने आदळली. त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी रितीक्षा गंभीर जखमी झाली. त्या स्थितीतसुध्दा तीने रक्तबंबाळ अवस्थेत आपल्या मामास मोबाईल करीत अपघात झाल्याचे व आई-बाबा व स्वतः जखमी झाल्याचा मेसेज दिला. त्यानंतर ती बेशुध्द झाली.
दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. जखमी मुलीस रुग्णालयात दाखल केले. तीच्यावर उपचार सुरु होते. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव, डोक्यासह मेंदुस गंभीर मार लागल्यामुळे उपचारा दरम्यान सोमवारी सायंकाळी तीचे निधन झाले. कुटुंबातील तीसर्या सदस्याचे निधन झाल्याने शेळके कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


