परभणी,(प्रतिनिधी) : राज्यातील कष्टकरी वृत्तपत्र विक्रेत्यांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा मिळण्याकरीता वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या निर्देशानुसार परभणी जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने 9 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात आला.
संघटनेचे अध्यक्ष अंबादास वाकोडे (खेडकर) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर जिल्हाधिकार्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. त्याद्वारे, वृत्तपत्र विक्रेते ऊन, वारा, पाऊस आणि थंडीची पर्वा न करता पहाटेपासून घरोघरी वर्तमानपत्रे पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. मात्र, या कष्टकरी घटकाला सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा, यासाठी कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी आवश्यक असल्याची मागणी संघटनेने केली. 10 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन महामंडळ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मोर्चात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नरहरी लिंगायत, जिल्हा उपाध्यक्ष मनोज कटुकुरी, सचिव सुनील करपे, कोषाध्यक्ष प्रदीप लांडगे, संघटक प्रकाश गुंड, प्रसिद्धीप्रमुख किरण क्षीरसागर, किरण स्वामी, अशोक शर्मा, कैलास जाधव, सुधाकर वाठोरे, गोपाळ मोरे, सचिन महाजन, संजय सुतारे, संतोष जाधव, गोविंद खनगे, गोविंद मोरे, गोविंद दुधाटे, रामकिशन समिंद्रे, सूर्यकांत मोगल, सुभाष जव्हार, स्वप्निल बंगाळे यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या न्याय्य मागण्यांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी आणि कष्टकरी विक्रेत्यांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान करावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.


