तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्र. १८०० २२२ ३६५*
परभणी,(प्रतिनिधी) “सुरक्षित अन्न- निरोगी महाराष्ट्र”चे उद्दिष्ट डोळ्यठेऊन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व खाद्य व्यवसाय चालकांसाठी व्यापक अन्न सुरक्षा अनुपालन आदेश काढले आहेत. या आदेशानुसार सर्व खाद्य व्यवसायांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत दंडात्मक कारवाई, परवाना निलंबन अथवा रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येते.
दि. १३ ऑक्टोंबर रोजी विशेष मोहिमे अंतर्गत मे. जुबिलंट फूडवर्क्स लिमिटेड (डॉमिनोज पिझ्झा), येलदरकर कॉलनी, वसमत रोड, परभणी या आस्थापनेची तपासणी करण्यात आली असता सदर ठिकाणी अन्न सुरक्षा व मानदे (परवाना व नोंदणी) नियमन, २०११ मधील परिशिष्ट-४ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले होते. जसे सदर ठिकाणी शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ बनविण्याच्या ठिकाणी पार्टिशन नाही. कोल्डस्टोरमध्ये खराब झालेला कच्चा अन्न पदार्थ आढळला. नियमाप्रमाणे खाद्य पदार्थांचे कॅलरीबाबत/उष्मांका बाबत ग्राहकसाठी माहितीचे फलक लावलेले नव्हते. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे योग्य अॅप्रन, हातमोजे, शू-कव्हर इत्यादी साधने (जिथे आवश्यक आहे तिथे) उपलब्ध नव्हते. अन्न व्यवसायाकडे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणारी प्रभावी यंत्रणा नाही. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे अन्न सुरक्षितपणे हाताळण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये नाहीत किंवा त्यांना तसे प्रशिक्षण दिलेले नाही, इत्यादि.
त्यामुळे सदर पेढीचा परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वैभव ठोंबरे यांनी केली.
आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खांदयतेल, खवा-मावा, मिठाई, मसाले इत्यादि अन्न पदार्थांची मागणी वाढत असते व अधिक नफा कमाविण्याच्या दृष्टीने काही उत्पादक/ विक्रेते अन्न पदार्थ अधिक आकर्षक दिसण्याकरिता ज्या अन्नपदार्थामध्ये खाद्यरंग वापरण्यास बंदी आहे त्यामध्ये त्याचा वापर व ज्या अन्नपदार्थांमध्ये खाद्यरंग वापरण्याची सूट आहे त्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त खाद्यरंग किंवा अखाद्यरंग वापरणे, कमी दर्जाचा कच्चा माल वापरणे इत्यादि गैरमार्गाचा अवलंब करण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्याकरिता व ग्राहकांना निर्भेळ, दर्जेदार आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व अन्न व्यावसाईक ज्यामध्ये खवा-मावा-मिठाई ईतर दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक/विक्रेते, रेस्टॉरेंट-फास्टफूड-चायनीज विक्रेते, खांदयतेल, मसाले व ईतर अन्नपदार्थ विक्रेते यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ नुसार अन्न व्यवसाय करणे परवाना, नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा.
आपल्या आस्थापनेत तयार होत असलेल्या किंवा विक्रीसाठी ठेवलेल्या अन्नपदार्थामध्ये अखाद्यरंग याचा वापर करण्यात येऊ नये तसेच खाद्यरंग व ईतर Food additives चा अन्नसुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीनुसारच वापर करण्यात यावा.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मिठाई इत्यादि नाशिवंत अन्न पदार्थांची साठवणूक योग्य तापमानावरच करावी. तसेच मुदतबाह्य, खाण्यासाठी अयोग्य अन्न पदार्थांची विक्री करू नये.
चहा व ईतर खाद्यपेय ग्राहकांना देण्याकरिता प्रतिबंधित सिंगल युज प्लास्टिकच्या कप, प्लेट ई. चा वापर करू नये. फक्त फूड ग्रेड प्लॅस्टिक च्या वस्तूंचा वापर करावा. वर्तमानपत्राच्या कागदामध्ये अन्न पदार्थ देऊ नये.
अन्नपदार्थ उत्पादन, वाटप, हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी.
तसेच ग्राहकांना असे आवाहन करण्यात येते की, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवायची असल्यास टोल फ्री क्र. १८०० २२२ ३६५ तसेच https://complaints.mahafda.in या संकेतस्थळावर वर जाऊन आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषधी विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) ए. ई. चौधरी यांनी केले आहे.
***


