अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध
परभणी, दि.16(जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्यासह त्यांचा निपटारा करण्याच्या प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ९५-जिंतूर विधानसभा मतदारसंघांतर्गत सेलू तालुक्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि पात्र मतदारांनी या सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या १२ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त निर्देशांनुसार हा बदल करण्यात आला आहे. असून, आता दावे व हरकती दि. 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत दाखल करता येणार आहेत. तर नोटीस कालावधी आणि दावे व हरकतींचा निपटारा दि. १० नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहे. सर्व दावे आणि हरकतींचा निपटारा झाल्यानंतर अंतिम मतदार यादी ही दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदार यादीतील नाव, तपशील किंवा नोंदणीसंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यासाठी पात्र नागरिकांनी निर्धारित कालावधीत संबंधित प्रक्रियेत सहभागी व्हावे. मतदार नोंदणी व दुरुस्तीच्या प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांचा सहभागी व्हावे. मतदार यादीतील नोंदी अचूक व अद्ययावत राहण्यासाठी पात्र मतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले आहे.
*-*-*-*-*-*-*


