शनिवार व रविवारी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे ; BLO सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थित राहणार
परभणी, (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमांतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार (ASDD) मतदारांच्या अनुषंगाने मतदार यादी शुद्धीकरणाची कार्यवाही सुरू आहे. या प्रक्रियेत सुमारे १ लाख ८० हजार मतदारांपैकी पात्र असलेल्या मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या अनुषंगाने नागरिकांना गणना प्रपत्र (Enumeration Form – EF) सादर करणे सुलभ व्हावे, यासाठी शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ आणि रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन्ही दिवशी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्र पर्यवेक्षक सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्रांवर पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांना आवश्यक नमुना अर्ज व गणना प्रपत्र उपलब्ध करून देण्यात येणार असून, पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करता येणार आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गणना प्रपत्र तयार करणे व मुद्रित करण्याची कार्यवाही दि. १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत, गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन दि. १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत, तर प्राप्त गणना प्रपत्रे निकाली काढण्याची कार्यवाही दि. १० डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्यासाठी दि. १५ डिसेंबर २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली असून, मतदार यादीचे अंतिम प्रकाशन दि. २२ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे. तसेच, सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी शिबिराच्या दोन्ही दिवशी विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाजाचा आढावा घ्यावा व शिबिरांचे प्रभावी नियोजन करावे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या दि. ०९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रातील सूचनांचे काटेकोर पालन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ज्या नागरिकांना अद्याप गणना प्रपत्र सादर करता आलेले नाही किंवा ज्यांना मतदार यादीतील आपली नोंदणी पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावयाची आहे, अशा पात्र नागरिकांनी दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर भेट देऊन या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा.श्री आण्णासाहेब चव्हाण, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
***


