परभणी, (प्रतिनिधी) : तृतीयपंथीय समुदायातील कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने परभणीत आयोजित ‘उमंग महोत्सवा’चे बुधवारी (ता. २५) बी. रघुनाथ रंगमंदिर येथे उत्साहात उद्घाटन झाले. कार्यक्रमास परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अरुणा संगेवार, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे विभागीय अधिकारी सचिन पाईकराव आणि महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहउपाध्यक्ष डॉ. सान्वी जेठवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा प्रारंभ झाला.

तृतीयपंथीय समुदायातील अनेक व्यक्तींमध्ये विविध कलागुण आणि कौशल्ये आहेत. मात्र, सामाजिक स्तरावर त्यांना अनेकदा अपेक्षित संधी मिळत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उमंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून तृतीयपंथीय कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तृतीयपंथीय कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच समाजात त्यांच्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
***


