परभणी, (प्रतिनिधी)– राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याकरिता सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नव्याने प्रथम वर्षास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज करण्याकरीता दि. १० डिसेंबर २०२६ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच परभणी जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या काही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाल्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना विहित मुदतीत योजनेसाठी अर्ज करता आले नव्हते. कोणताही पात्र विद्यार्थी या शासकीय लाभापासून वंचित राहू नये, या उद्देशाने प्रथम वर्षाच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यानुषंगाने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नव्याने प्रथम वर्षास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑफलाईन प्रवेश अर्ज दि. १०.१२.२०२६ पर्यंत भरुन कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक रामेश्वर मुंडे यांनी केले आहे.
***


