परभणी,(प्रतिनिधी) : घराघरांत वाचनसंस्कृती रुजावी, कुटुंबातील सदस्यांनी एकत्रितपणे वाचन करावे आणि पालकांनी मुलांसमोर वाचनाचा आदर्श निर्माण करावा, या उद्देशाने होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अॅन्ड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक यांनी आयोजित केलेली विजयवाडा ते रामेश्वरम सायकल मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. 13 ते 19 नोव्हेंबर या सात दिवसांच्या कालावधीत त्यांनी 1 हजार 7.41 किलोमीटरचा सायकल प्रवास केला. आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी आणि तामिळनाडू या तीन प्रदेशांतून प्रवास करत त्यांनी कौटुंबिक वाचनसंस्कृतीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविला.
डॉ. पवन चांडक हे वैद्यकीय व्यवसायासोबतच ‘आनंदी वाचन पेटी’ या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. कुटुंबातील सदस्यांनी दररोज एकत्र बसून पुस्तके वाचावीत, पालकांनी स्वतः वाचन करून मुलांसमोर आदर्श ठेवावा आणि घराघरांत सामूहिक वाचनाची परंपरा निर्माण व्हावी, हा या सायकल मोहिमेमागील मुख्य हेतू होता. या मोहिमेत जिजाऊ ज्ञानतीर्थचे संस्थापक प्रा. नितीन लोहट आणि अरुण आडे यांनी सायकलस्वार म्हणून सहभाग घेतला. तर सिद्धेश्वर जाधव आणि कल्याण लोहट यांनी मोटारसायकलवरून सहकार्य केले. विजयवाडा, गुंटूर, चिराला, ओंगोल, नेल्लोर, कवाली, गुम्मिडिपुंडी, काथिवक्कम, चेन्नई, मरिना बीच, पुदुच्चेरी, कुंभकोणम, तंजावर आणि कराईकुडी असा प्रवास करीत ही मोहीम रामेश्वरम येथे पोहोचली.
या मोहिमेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. रामेश्वर नाईक आणि सचिन कोंडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच चेन्नई येथील इंडियन होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशनचे डॉ. पीटर आणि डॉ. रविंद्रन यांनी प्रसिद्ध चर्च परिसरातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुक्कामाची व्यवस्था केली. रामेश्वरम येथील श्री रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेऊन या मोहिमेचा समारोप करण्यात आला. त्यानंतर सायकलींसह रेल्वेने परतीचा प्रवास सुरू करण्यात आला.
सायकलिंगच्या माध्यमातून केवळ अंतर पार करणे हा या मोहिमेचा उद्देश नव्हता, तर प्रत्येक घरात वाचनाची आवड निर्माण व्हावी, कुटुंबातील सदस्यांनी एकत्र पुस्तके वाचावीत आणि वाचन ही केवळ वैयक्तिक सवय न राहता कौटुंबिक संस्कृती बनावी, हा व्यापक संदेश डॉ. पवन चांडक यांनी या उपक्रमातून दिला.
नागरीकांनी सायकलस्वारांना दिले प्रोत्साहन…
या प्रवासादरम्यान तंजावर येथील मराठा पॅलेसमधील ऐतिहासिक सरस्वती महाल ग्रंथालयाला दिलेली भेट विशेष ठरली. या ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथ आणि हस्तलिखितांच्या माध्यमातून समृद्ध ज्ञानपरंपरेचा परिचय झाला. तसेच रामेश्वरम येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मारकालाही भेट देण्यात आली. सात दिवसांच्या या प्रवासात कडक ऊन, किनारपट्टीवरील उष्ण हवामान आणि विरुद्ध दिशेने वाहणार्या वार्याचा सामना करावा लागला. तेलुगू आणि तमिळ भाषेच्या अडचणी असूनही स्थानिक नागरिकांशी संवाद साधून मोहिमेचा उद्देश समजावून सांगण्यात आला. अनेक ठिकाणी नागरिकांनी मोहिमेविषयी उत्सुकता दाखवत सायकलस्वारांना प्रोत्साहन दिले.


