परभणी,(प्रतिनिधी) : महानगरपालिका हद्दीतील मध्यवस्तीसह चोहोबाजूंच्या वसाहतीतील प्रमुख चौक व रस्त्यांवर दुतर्फा बस्तान मांडून बसलेल्या अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना या फेरीवाल्यांविरोधात स्वतः कारवाई करेल, असा गंभीर इशारा शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला.

शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.07) महानगरपालिका प्रशासनास एक निवेदन सादर करीत वसमत रस्ता, जिंतूर रस्ता तसेच अन्य प्रमुख रस्ते व मध्यवस्तीतील व्यापारीपेठांमधून हे अनाधिकृत विक्रेते धुमाकूळ घालत आहेत. विशेषतः रस्त्याच्या दुतर्फा नव्हे रस्त्यावरसुध्दा सकाळपासून रात्री उशीरापर्यंत ठाण मांडून या विक्रेत्यांनी शहर वाहतूकीचे अक्षरशः तीनतेरा वाजविले आहेत. काही विक्रेत्यांनी ठाण मांडून भोंग्याद्वारेसुध्दा दिवसभर माल विक्रीचे प्रकार सुरु केले आहेत. या प्रकाराने सर्वसामान्य वाहनधारक, नागरीक व व्यापारीसुध्दा अक्षरशः कंटाळले असून या अनाधिकृत बस्तान मांडून बसणार्या व हातगाड्यावाल्या व्रिकेत्यांना महापालिका प्रशासनाने पिटाळून लावावे, अन्यथा शिवजयंतीच्या उत्सवानंतर शिवसेना स्वतः कारवाई सुरु करेल, असा गंभीर इशारा भरोसे यांच्यासह शिष्टमंडळाने दिला. हे सर्व विक्रेते हे अनाधिकृत आहेत. या विक्रेत्यांकडे कोणताही परवाना नाही, कुठलीही नोंद नाही, हे ही या शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
यावेळी बाळासाहेब पानपट्टे, सचिन पाटील, बालाजी मोहिते, दिपक शिंदे, गीता सुर्यवंशी, कल्पना दळवी, बालिका सुरनर, पूजा मोरे, दासराव रनेर, सुनील खुळे, प्रविण गायकवाड, व्यंकटी जावळे, रामेश्वर जावळे, निरज बुचाले, संदीप शिंदे, दिपक शिंदे, उमेश जाधव यांची उपस्थिती होती.


