परभणी,(प्रतिनिधी) : महानगरपालिका हद्दीतील गणेश नगर परिसरातील महात्मा फुले विद्यालया समोरील तीन अतिक्रमणे महापालिकेच्या एका पथकाने मंगळवारी (दि.11) जमीनदोस्त केली.
महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणाच्या विरोधात मोहिम सुरु केली. प्रशासकीय इमारतीच्या संरक्षण भिंती लगतचे अतिक्रमण सोशल मिडीयातून गाजल्याबरोबर महापालिका प्रशासनाने हटवले. त्या पाठोपाठ मंगळवारी फुले विद्यालयाच्या समोरील मनपाच्या खूल्या जागेवरील तीन अतिक्रमणे जमीनदोस्त केली. सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने त्या स्थळी ताफ्यानिशी दाखल झाल्याबरोबर अतिक्रमणकर्त्यांनी अतिक्रमण काढण्यात विरोध केला, मात्र नियमानुसार मोजणी करुनच अतिक्रमण काढले जातील, असे या पथकाने स्पष्ट केल्यानंतर जागेची मोजणी केली व मार्कींग करुन अतिक्रमणे काढण्यात आली. शाखा अभियंता राहुल धुतडे, कर अधिक्षक जुबेर हाशमी, नगर रचना विभागाचे मिर अलमश, लक्ष्मण जोगदंड, कुणाल भारसाखळे, तनवीर बेग, अथर, विद्युत अभियंता सोहेल यांच्यासह अन्य कर्मचार्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
दरम्यान, महापालिका आयुक्त धैर्यशिल जाधव यांच्यामुळे प्रशासनाला एक नवी उर्जा मिळाली असल्याचे मत सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी व्यक्त केले. त्यामुळे अशा कारवाया निसंकोचपणे शक्य होत आहेत, असे म्हटले. दरम्यान, आयुक्त जाधव यांनी अतिक्रमणकर्त्यांना स्वतःहुन अतिक्रमण काढून घ्यावे, असे आदेश बजावले आहेत. (छाया उत्तम बोरसुरीकर)