परभणी,(प्रतिनिधी) : येथील इनायत नगरातील मॉडेल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सिध्दीकी अहेमदी मोहम्मद अब्दुल मजीद व लिपीक बुढण खान महेबुब खान पठाण या दोघांना 18 हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
दरम्यान, मुख्याध्यापिका सिध्दीकी अहेमदी यांच्या निवासस्थानातून पथकाने 9 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कमही ताब्यात घेतली.
या प्रकरणाबाबत माहिती अशी की, तक्रारकर्ता 17 मार्च रोजी पर्यवेक्षक म्हणून त्यांचे वर्गात काम करीत असतांना लिपीक बुढण खान पठाण यांनी त्यांना वर्गात येवून सांगितले की, तुम्हाला माहे एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2024 या सहा महिन्यांचे प्रलंबित असणारे वेतन मिळाले आहे. त्या वेतनातून 1 महिन्याचे 3 हजार रुपये असे सहा महिन्याचे एकूण 18 हजार रुपये मुख्याध्यापिका सिध्दीकी अहेमदी मॅडम यांनी मागितले आहेत, असे म्हटले. तक्रारकर्ता यांनी मुख्याध्यापिका सिध्दीकी अहेमदी यांची भेट घेतली असता त्यांनीही सहा महिन्याच्या वेतनातून 18 हजार रुपये उद्या आणून द्या, असे म्हटले.
तक्रारकर्त्याने लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे या संबंधिची तक्रार दिल्यानंतर 18 मार्च रोजी या खात्याच्या एका पथकाने पंचा समक्ष तपासणी केली तेव्हा मुख्याध्यापिका सिध्दीकी अहेमदी यांनी संबंधित तक्रारकर्त्यास तुम्हाला मिळालेल्या सहा महिन्याच्या प्रलंबित वेतनातून 18 हजार रुपये द्यावेच लागतील, असे म्हणून लाचेची मागणी केली व रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शविली. या आधारेच या खात्याने बुधवार 19 मार्च रोजी सापळा रचला, तेव्हा मुख्याध्यापिका सिध्दीकी अहेमदी यांनी शाळेतच संबंधित तक्रारकर्त्यास ती रक्कम लिपीक बुढण खान पठाण यांच्याकडे द्यावी, असे सांगितले. लिपीकाने संबंधित तक्रारकर्त्याकडून मुख्याध्यापिका सिध्दीकी अहेमदी यांच्या सांगण्यावरुन ती रक्कम स्विकारली. त्याचवेळी या पथकाने मुख्याध्यापिका व लिपीक या दोघांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.
दरम्यान, मुख्याध्यापिका सिध्दीकी अहेमदी यांच्याकडून झडतीतून पथकाने रोख रक्कम 9 हजार 840 रुपये व लिपीक बुढाण खान यांच्याकडून 5 हजार 190 रुपये व मोबाईल ताब्यात घेतले. पथकाने मुख्याध्यापिका सिध्दीकी अहेमदी यांच्या निवासस्थानी घेतलेल्या झडतीतून 9 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. दरम्यान या दोघांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
पोलिस अधिक्षक संदीप पालवे, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर हे सापळा अधिकारी म्हणून तर पोलिस निरीक्षक अल्ताफ मुलानी हे तपास अधिकारी म्हणून, सापळा पथकात पोलिस निरीक्षक बसवेश्वर जक्कीकोरे, एएसआय निलपत्रेवार, सीमा चाटे, अतूल कदम, कल्याण नागरगोजे, शाम बोधकर, राम घुले, नामदेव आदमे, जे.जे. कदम आदी सहभागी होते.