परभणी (प्रतिनिधी) आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पुढाकारातून पाथरी रोड येथील आर.पी हॉस्पिटल येथे येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अत्याधुनिक MRI (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग) सेंटर सुरू होणार आहे. या अत्याधुनिक सुविधेमुळे रुग्णांना अचूक निदान आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल. अशी माहिती महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी दिली.
या नवीन MRI सेंटरमध्ये अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये उच्च रिझोल्यूशन इमेजिंग, जलद स्कॅनिंग आणि रुग्णांच्या सोयीसाठी विशेष सुविधांचा समावेश आहे. हे सेंटर मेंदू, हृदय, सांधे आणि इतर अवयवांचे तपशीलवार निदान करण्यास सक्षम असेल. याशिवाय, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी धातू-मुक्त वातावरण आणि प्रशिक्षित तंत्रज्ञांचा समावेश आहे.
आर.पी.हॉस्पीटल चे प्रमुख आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले, “रुग्णसेवा आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा प्रसार हे आमचे ध्येय आहे. या MRI सेंटरच्या माध्यमातून आम्ही समाजाला उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत आहोत. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ही सुविधा सुरू होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
तसेच परभणी मेडिकल कॉलेज व आर पी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगितले, “या सेंटरच्या उभारणीत आमच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले आहेत. आम्ही रुग्णांना अचूक निदान आणि सुरक्षित उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
या सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला राज्यातील प्रमुख मान्यवर आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहणार असल्याचे हॉस्पीटल प्रशासनाने सांगितले आहे.