परभणी,(प्रतिनिधी) वैद्यकीय शिक्षण आणि गरजू रुग्णांसाठी देहदानाचा महत्त्वपूर्ण उपक्रम परभणी येथील आर. पी. हॉस्पिटल आणि परभणी मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविला जात आहे. या उपक्रमाला प्रोत्साहन देत, सेलू (जि. परभणी) येथील श्री. बाबासाहेब सोनबा बाबर आणि त्यांच्या पत्नी सौ.कालिंदा बाबासाहेब बाबर यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे.
परभणी मेडिकल कॉलेज आणि आर. पी.हॉस्पिटलने या उपक्रमाला गती देत अनेकांना देहदानासाठी प्रेरित केले आहे. या उपक्रमांतर्गत देहदानाची प्रक्रिया सुकर आणि पारदर्शक करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
सेलू येथील बाबासाहेब आणि कालिंदा बाबर यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा संकल्प केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे समाजात देहदानाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. बाबर दाम्पत्याने आपला हा संकल्प परभणी मेडिकल कॉलेज आणि आर. पी. हॉस्पिटलच्या समन्वयाने अधिकृतपणे नोंदवला आहे.
परभणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी बाबर दाम्पत्याच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी बाबासाहेब आणि कालिंदा बाबर यांचे आभार मानताना सांगितले, “देहदान हा एक अत्यंत उदात्त आणि समाजहिताचा निर्णय आहे. बाबर दाम्पत्याने घेतलेल्या या संकल्पामुळे वैद्यकीय शिक्षणाला बळ मिळेल आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मदत होईल. त्यांच्या या पावलाने इतरांनाही प्रेरणा मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.”
परभणी मेडिकल कॉलेज आणि आर. पी. हॉस्पिटल येथे देहदानाची प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे. इच्छुक व्यक्तींना त्यांच्या संकल्पाची नोंदणी करावी लागते आणि मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या संमतीने देह स्वीकारला जातो. यासाठी हॉस्पिटलने एक समर्पित कक्ष स्थापन केला आहे, जो देहदानासंबंधी सर्व माहिती आणि सहाय्य पुरवतो.