*रुग्णांना आरोग्य विभागामार्फत उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार*
परभणी (प्रतिनिधी): हिमोफेलिया आजारावरील हेमलिब्रा इंजेक्शन आपल्या जिल्ह्यात उपलब्ध झाल्याने
हिमोफेलीया रुग्णांना उपचारासाठी जिल्ह्याच्या बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. येणाऱ्या काळात रुग्णांना आरोग्य विभागामार्फत उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य कुटुंब-कल्याण, पाणी पुरवठा-स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते हिमोफेलीया रुग्णांसाठीच्या “हेमलिब्रा इंजेक्शन”चे लोकार्पण पार पडले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे, हिमोग्लोबिनोपॅथीचे राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर, किरण नांदेडकर, अजित लांब, मनोज मोरे, नंदकिशोर सारंग, मनीषा राठोड, विलास बुद्रुक यांची उपस्थिती होती.
श्रीमती बोर्डीकर यांनी हेमोफिलियाग्रस्त रुग्णांची तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच कॅन्सरचे ऑपरेशन झालेल्या रुग्णाला भेट देऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
त्या म्हणाल्या की, हिमोफेलिया आजारावरील हेमलिब्रा इंजेक्शन आपल्या जिल्ह्यात उपलब्ध करून देणारा परभणी हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. त्यामुळे हिमोफेलिया रुग्णांना दिलासा मिळाला आहे. कॅन्सर ऑपरेशन आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात झाले, ही एक आपल्या परभणीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. त्याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व अधिकारी व स्टाफचे अभिनंदन. येणाऱ्या काळात आरोग्य विभागामार्फत रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स, स्टाफ यांची उपस्थिती होती.
*हिमोफेलीया रक्ताचा अनुवंशीक आजार*
हिमोफेलीया हा रक्ताचा अनुवंशीक आजार असुन माता ह्या आजाराची वाहक आहे; परंतु मातेला या आजाराचा कुठलाही त्रास होत नाही. मात्र पुरुष अपत्यास मातेकडुन हा वाहक आल्यास अशा बालकास होणारा रक्तस्राव थांबत नाही.
रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेल्या Facter 8 & facter 9 या घटकाची बालकांमध्ये कमतरता असल्यामुळे बालकास रक्तस्त्राव झाल्यास त्यांना रक्त थांबविण्यासाठी फॅक्टर 8 व फॅक्टर 9 हे घटक दिल्यासच रक्त स्राव थांबतो.
सदरील फॅक्टर 8 व फॅक्टर 9 हे घटक घेण्यासाठी परभणी व नजीकच्या जिल्ह्यातील पालकांना मुंबई, पुणे येथे जावे लागत होते गेल्या 6 वर्षापासुन परभणी जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयात सदरील घटकांची उपलब्धता झाल्यामुळे रुग्णांचा वेळ पैसा व जीव वाचवण्यास मदत झाली.
मात्र, फॅक्टर 8 व फॅक्टर 9 या घटकाचा प्रभाव फार कमी कालावधीसाठी असतो ही बाब लक्षात घेऊन परभणी जिल्ह्यातील हिमोफेलीया रूग्णाकरीता अत्याधुनिक उपचार असलेले हेमलीब्रा हे इंजेक्शन परभणीतील शासकिय रुग्णालयात उपलब्ध करण्यात आले आहे. सदरील इंन्जक्शनचा प्रभाव दिर्घ कालावधीसाठी राहत असल्यामुळे हिमोफेलीया ग्रस्त रुग्णांचे आयुष्यमान सुखकर होण्यास मदत होणार आहे.
परभणी जिल्ह्यात एकुण हिमोफेलीयाचे 48 रुग्ण असुन महाराष्ट्रात प्रथमच परभणी येथे हिमोफेलीयाग्रस्त रूग्णांसाठी अत्याधुनिक हेमलीब्रा इंजेक्शन उपलब्ध करण्यात आले आहे.
***