परभणी, (परभणी) — परभणी जिल्ह्यातील ७ नगरपरिषदांच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान, तर ०३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार असल्याने या सर्व नगरपरिषदाच्या कार्यक्षेत्रात दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजीपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, नगरपालिका प्रशासन शाखेचे जिल्हा सह आयुक्त महेश गायकवाड व पत्रकार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२५ असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी ०३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदाच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.
एकापेक्षा अधिक मते देणे अपेक्षित – नगरपरिषदेच्या निवडणुकीत बहुसदस्यीय पद्धती असून एका प्रभागात सर्वसाधारणपणे दोन जागा असतात. एकूण सदस्यसंख्येचा विषम आकडा असलेल्या नगरपरिषदेत एका प्रभागात तीन जागा असतात. त्याचबरोबर थेट अध्यक्षपदासाठीदेखील मतदान होत असल्याने साधारणतः एका मतदाराने तीन ते चार जागांसाठी मत देणे अपेक्षित आहे. एका नगरपरिषदची एकूण सदस्य संख्या कमीत कमी २० ते ७५ पर्यंत असते.
जात वैधता प्रमाणपत्राचा पुरावा – राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मुभा देण्यासाठी शासनाने संबंधित अधिनियमात दुरुस्ती केली आहे. मात्र, असा उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून त्याला सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद करण्यात आली आहे, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.
नामनिर्देशनपत्रासाठी संकेतस्थळ – स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येऊ शकतील, संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत काढून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ती प्रत विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक राहील.
मतदान केंद्र आणि ईव्हीएम – परभणी जिल्हातील नगरपरिषदाच्या निवडणुकांसाठी एकूण २ लाख ४९ हजार २६ मतदार असून त्यासाठी सुमारे २५० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे.
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा – नगरपरिषदाच्या निवडणुकांतील थेट अध्यक्ष आणि सदस्यपदाच्या उमेदवारासाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च मर्यादा वाढविली आहे. ती पुढीलप्रमाणे ‘ब’ वर्ग नगरपरिषदः थेट अध्यक्ष रु. ११,२५,०००, सदस्य- रु. ३,५०,००० आणि ‘क’ वर्ग नगरपरिषदः थेट अध्यक्ष रु. ७,५०,०००, सदस्य- रु. २,५०,०००.
मतदारांसाठी संकेतस्थळ – नगरपरिषदाच्या निवडणुकीसाठी मतदाराला मतदार यादीतील आपले नाव शोधण्याकरिता https://mahasecvoterlist.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरच नाव शोधता येईल. संकेतस्थळावरील Search Name in Voter List यावर क्लिक करून नाव किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर मतदार यादीतील आपल्या नावासोबतच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल.
मतदार जागृती -नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्याप्रमाणावर मतदार जागृती करण्याचे आदेश संबंधित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि नगरपरिषदाच्या मुख्याधिकारी यांना दिले आहेत. पारंपरिक प्रसारमाध्यमांबरोबरच नवीन माध्यमांचा कौशल्यपूर्ण वापर करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्वांना निर्देश दिले आहेत. मतदार जागृतीसंदर्भातील सर्व सूचना व निर्देश मार्गदर्शक स्वरुपात असून, स्थानिक पातळीवर काही नावीन्यपूर्ण उपक्रम सूचल्यास तेही आपापल्यास्तरावर राबविण्याबाबत कळविले आहे.
संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर चिन्ह नमूद करण्यात येते. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात येईल. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाईल. त्याने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु प्रतिसाद न मिळाल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.
मतदान केंद्रावरील सुविधा -मतदान केंद्रावर दिव्यांग, तान्ह्या बाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आदींना प्राधान्याने मतदान करू दिले जाईल. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी रॅम्पची व्यवस्था नसल्यास तात्पूर्ती सुविधा उभारली जाईल. व्हिलचेअरचीही व्यवस्था असेल. मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलबद्ध करून दिली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा असणे आवश्यकचे असेल; परंतु शक्य असेल तिथे आदर्श मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न असेल. महिला मतदारांचो संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी-कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी महिला असतील, असे मतदान केंद्र ‘पिंक मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जाईल. मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाईल दूरध्वनी नेण्यास बंदी असेल. मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये; परंतु मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना मोबाईल दूरध्वनी जमा करण्यासाठी शक्य तिथे कक्ष असेल.
मनुष्यबळाची व्यवस्था – नगरपरिषदाच्या या निवडणुकांसाठी ०७ निवडणूक निर्णय अधिकारी आणि १४ सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आवश्यकता असून, त्याची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांना आवश्यक मनुष्यबळाबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
आचारसंहिता – निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषदाच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषदाच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील नगरपरिषदाच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला नगरपरिषदा व नगरपंचातीच्या कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपतीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यातील नगरपरिषदा (०७) – गंगाखेड, जितूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, आणि पूर्णा.
महत्वाच्या तारखा – नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात १० नोव्हेंबर २०२५, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५, नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५,अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५, अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२५, मतदानाचा दिवस ०२ डिसेंबर २०२५, मतमोजणीचा दिवस ०३ डिसेंबर २०२५.
एकूण मतदार व मतदान केंद्र – पुरुष मतदार- १,२५,५०९, महिला मतदार- १,२३,५०५,इतर मतदार- १२, एकूण मतदार- २,४९,०२६,एकूण मतदान केंद्र- २५०,
एकूण जागा आणि आरक्षित जागा – निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदा- ०७, एकूण प्रभाग – ८१, एकूण जागा- १६५, महिलांसाठी जागा- ८४, अनुसूचित जातींसाठी जागा- २३,अनुसूचित जमातींसाठी जागा- ०२, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- ४४
****


