परभणी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या संघटनात्मक बळकटीसाठी दोन महत्त्वपूर्ण नेत्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. श्री. संजय भाऊसाहेब कुलकर्णी आणि श्री. बाबा रावसाहेब कातकडे यांची परभणी महानगर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीराव भरोसे यांच्या हस्ते दोन्ही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

नियुक्तीप्रसंगी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीराव भरोसे, श्री. भालचंद्र गोरे, श्री. प्रवीण गायकवाड, श्री. शेख निहाल, श्री. विजय गायकवाड यांसह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे परभणी महानगर भाजपाच्या संघटन कार्याला अधिक वेग मिळणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवणे आणि बूथ ते महानगर स्तरावरील संघटन अधिक सक्षम करणे या दृष्टीने ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भाजपा परभणी महानगर आपल्या नव्या टीमच्या माध्यमातून आगामी निवडणुका प्रभावीपणे लढवण्यास सज्ज असून, दोन्ही पदाधिकाऱ्यांकडून संघटन विस्तारासाठी अधिक ऊर्जा आणि दिशा मिळेल, असा विश्वास जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला.


