परभणी, (प्रतिनिधी) मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार “वरिष्ठ नागरिक सन्मान” योजनेअंतर्गत वृद्धांकरिता जागृती युनिटच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर अधिकार, त्यांचे संरक्षण, प्रतिष्ठा व न्याय मिळवून देण्यासाठी जनजागृती शिबिर स्नेह ज्येष्ठ नागरिक महिला वृद्धाश्रम येथे संपन्न झाले.
सदर कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. एम. सादराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीचे सचिव भूषण म. काळे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मनातील न्यायालयाबाबतची भीती दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या कायदेशीर हक्कांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणींवर योग्य मार्गदर्शन व मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नेहमी त्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास जागृती युनिटचे सदस्य डॉ. ज्ञानेंद्र फुलझळके, विधीज्ञ राजू संघई, अधिकार मित्र पांडुरंग शिंदे व श्रुती माळी, भरोसा सेलच्या पोलीस सुनंदा साबणे मॅडम, मनपा सहायक आयुक्त गजानन जाधव तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्नेह ज्येष्ठ नागरिक महिला वृद्धाश्रमच्या अध्यक्षा सुनीता अहिरे यांनी सहकार्य केले.
***


