परभणी, (प्रतिनिधी) :”बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम बनवावे” विद्यार्थ्यांनी योग्य ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर यांनी केले.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, परभणी यांच्या वतीने तसेच सवंडकर मॅथ्स क्लासेस, परभणी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आज महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मनेश कोकारे, डॉ. महेश पाटील व डॉ. किरण सानप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. संभाजी सवंडकर, विभागप्रमुख प्रा. अजय वाढवे, प्रा. विनोद पवार व प्रा. शेख अक्रम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन सत्रात डॉ. मनेश कोकारे यांनी अभियांत्रिकीच्या विविध शाखा, त्यांचे स्वरूप, भविष्यातील संधी आणि रोजगाराच्या उपलब्ध क्षेत्रांविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. महेश पाटील यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्पे, केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP), आवश्यक कागदपत्रे व प्रवेशासंदर्भातील महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.तसेच, महाविद्यालयाचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर नियोजन, कौशल्य विकास, उच्च शिक्षणाच्या संधी आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला सक्षम बनविण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी योग्य ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांशी संवाद साधला. उपस्थित पालकांनीदेखील प्रवेश प्रक्रिया व करिअर निवडीसंदर्भातील शंकांचे निरसन करून घेतले. मार्गदर्शकांच्या प्रभावी सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरविषयक योग्य दिशा मिळाली.
या कार्यक्रमास बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरविंद लोहट यांनी केले, तर प्रा. अमोल मगर यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


