परभणी (प्रतिनिधी)ः परभणी येथील आ.डॉ.राहुल पाटील यांच्या ‘परभणी मेडिकल कॉलेज, आर.पी.हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत परभणी वैद्यकीय महाविद्यालयाची ओळख राष्ट्रीय स्तरावर नेवून परभणी शहरासाठी नावलौकिक मिळवला आहे.
आंतरराष्ट्रीय क्लिनिकल ट्रायल्स(जागतिक वैद्यकीय संशोधन) दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षातील एमबीबीएस (MBBS) विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत पंचम आल्हाट, अंजली पवार आणि योगेश ननकानी या विद्यार्थ्यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. देशातील विविध राज्यांतील ७२ वैद्यकीय महाविद्यालयांमधून सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये या संघाने द्वितीय स्थान मिळविले.
ही राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्ध्येत विद्यार्थ्यांची तयारी आणि त्यांचा सहभाग यासाठी परभणी मेडिकल कॉलेजच्या औषधशास्त्र (फार्माकॉलॉजी) विभागातील प्राध्यापकानी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय संशोधन व औषधशास्त्र यांचा वापर विषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या ज्ञानाला वाव देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रमुख आ.डॉ.राहुल पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी विजेत्यांचा व मार्गदर्शक डॉ. ओरूज फातिमा यांचा सत्कार करून अभिनंदन केले.


