‘एकल महिला’ नव्हे, ‘पूर्णागिणी’ : जिल्हाधिकारी यांचा सकारात्मक विचारांचा संदेश*
परभणी, (प्रतिनिधी) : महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीने आयोजित ‘एकल महिला धोरण’ विषयावरील जिल्हास्तरीय कार्यशाळेला विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, एकल महिला प्रतिनिधी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी प्रभावी व सर्वसमावेशक धोरणाची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

कार्यशाळा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर तसेच महिला व बाल विकास समितीच्या सभापती ऐश्वर्या अजयराव चव्हाण उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी एकल महिलांची सुरक्षा, आर्थिक सक्षमीकरण, शारीरिक व मानसिक आरोग्य, तसेच त्यांच्या अपत्यांचे संगोपन आणि शिक्षण यांसाठी शासनास्तरावर अधिक प्रभावी व सर्वसमावेशक धोरण राबविण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी ‘एकल महिला’ या शब्दाऐवजी सकारात्मक दृष्टिकोनातून ‘पुर्णागिणी’ हा शब्दप्रयोग वापरावा, असे मत व्यक्त केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी मार्गदर्शन करताना व्यसनमुक्ती, मुलींचे उच्च शिक्षण आणि बालविवाह निर्मूलन या विषयांवर भर दिला. समाजातील बदलासाठी मुलींचे किमान पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभापती ऐश्वर्या अजयराव चव्हाण यांनी एकल महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा कार्यक्रम अधिकारी रेखा काळम यांनी कार्यशाळेची भूमिका, उद्दिष्टे आणि एकल महिला धोरणाची गरज स्पष्ट केली. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकल महिलांच्या जीवनमान उन्नतीसाठी प्रभावी धोरण तयार करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत एकल महिलांचे हक्क, शासकीय योजनांचा लाभ, रोजगाराच्या संधी, सामाजिक सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, निवारा आणि आर्थिक स्वावलंबन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित प्रतिनिधींनी आपल्या सूचना, अनुभव आणि अपेक्षा मांडत धोरण अधिक परिणामकारक करण्यासाठी विविध मुद्दे उपस्थित केले.
यावेळी विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी महिला सक्षमीकरणासाठी समन्वयाने काम करण्याची भूमिका मांडली. कार्यक्रमास प्रकल्प संचालक डॉ. स्मिता पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अंकुश चव्हाण यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी कार्यशाळेत प्राप्त झालेल्या सूचना व अभिप्राय राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
***


