परभणी, (प्रतिनिधी): राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिंतूर तालुक्यातील कसर येथे आज पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे आवाहन करत, कोणतेही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी जबाबदारीने सहभाग घ्यावा, असे सांगितले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून, यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे. गावागावांत लसीकरण केंद्रांसह फिरत्या पथकांद्वारेही बालकांपर्यंत लस पोहोचविण्यात येत आहे.
यावेळी उपस्थितांनी “दोन थेंब पोलिओचे… प्रत्येक बालकाच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्याचे!” हा संदेश देत जनजागृती केली.
पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजून पोलिओमुक्त भारताच्या संकल्पाला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
***


