परभणी,( प्रतिनिधी) पावसाळी अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल दांपत्यांना IVF उपचारांचा लाभ शासकीय योजनेतून मिळावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सभागृहात करताच आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत IVF उपचारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याची घोषणा केली.
पावसाळी अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार राहुल पाटील यांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला.ते म्हणाले,आजच्या काळात अनेक कुटुंबांसाठी IVF ही नितांत गरज बनली आहे. मात्र उपचारांचा प्रचंड खर्च सर्वसामान्यांना परवडत नसल्याने अनेकांचे पालकत्वाचे स्वप्न अपूर्ण राहते.त्यामुळे शासनाने राज्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल दांपत्यांना IVF उपचारांचा लाभ शासकीय योजनेतून मिळावा अशी मागणी केली.
यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत IVF उपचारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याची घोषणा केली. हा निर्णय राज्यातील हजारो गरजू दांपत्यांसाठी मोठा दिलासा देणारा असून, सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने उचललेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.


