परभणी, (प्रतिनिधी) – संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, परभणीकरीता सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजने अंतर्गत ५० लाभार्थी व बिजभांडवल योजने अंतर्गत ५५ लाभार्थीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. या योजनांच्या लाभासाठी चांभार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडुन विविध व्यवसायांसाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
तरी सदर योजनांसाठी कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील अर्ज दि. ०७ जुलै ते दि. 7 ऑगस्ट २०२६ पर्यंत (सार्वजनिक सुट्टी वगळता) कार्यालयीन वेळेत, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी या ठिकाणी स्विकारले जातील. परभणी जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार, या समाजतील बेरोजगार युवक-युवती, होतकरु, गरजु अर्जदारांनी या योजनेचा जास्त लाभ घ्यावा, असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अरुण राऊत यांनी केले आहे.
सदर योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी या पूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहुन दाखल करावेत. त्रयस्थ/मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – जातीचा दाखला (सक्षम अधिका-याकडुन घेतलेला असावा), महिलांसाठी जातीचा दाखला किंवा नावाबाबत शपथपत्र सादर करणे, सबंधित अर्जदाराचा सिबील स्कोअर कमीत कमी पाचशे असणे आवश्यक आहे (प्रत जोडणे), अर्जदाराच्या कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांच्याकडुन घेतलेला असावा), पासपोर्ट साईज फोटोच्या तीन प्रती जोडाव्या, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, राशन कार्ड झेरॉक्स प्रत, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक प्रत्येकी तीन प्रती जोडाव्या, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन जी एस.टी.चे), व्यवसाय ज्याठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती/करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना न ८) लाईट बिल, चालु वर्षातील टॅक्स पावती (या पैकी एक), उदमआधार, शॉप अॅक्ट लायसन किंवा ग्रा पं/ न.पा./मनपा यांचे व्यवसाय करण्यासाठीचे नाहरकत प्रमाणपत्र, बिजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल रिपोर्ट (सि.ए यांचा), बिजभांडवल योजनेसाठी एक सक्षम जामिनदार असणे आवश्यक आहे. (शेती धारक, किंवा नौकरीधारक किंवा प्रॉपर्टीधारक), वाहनासाठी लायसन्स, परवाने, बॅच आवश्यक, व्यवसाय सबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, यापुर्वी अनुदान न घेतल्या बाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे, अर्जदाराचे वय हे १८ ते ५० च्या दरम्यान असावे, सबंधीत अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, हे शैक्षणिक दाखल्यावर असलेल्या जन्म तारखेप्रमाणे असावे.
*-*-*-*-*


