परभणी, (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली सहायक मतदार नोंदणी अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व पत्रकारांची मार्गदर्शन बैठक झाली.
बैठकीत भारत निवडणूक आयोगाने १४ मे २०२६ रोजी जाहीर केलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. बीएलओमार्फत ३० जून ते २९ जुलै या कालावधीत घरभेटीद्वारे गणना फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व पात्र मतदारांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन करण्यात आले.
७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्ष, पत्रकार, अधिकारी आणि नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले.
बैठकीस तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शिवाजी मगर, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पत्रकार तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
***


