परभणी, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय परभणी अंतर्गत मुख्य महामंडळासह १३ उपमहामंडळांच्या माध्यमातून लघुउद्योग, व्यवसाय तसेच शिक्षणासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी विविध योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
जिल्हा कार्यालयांतर्गत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळासह जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळ, संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ, लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ, सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ, संत भोजनिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ, आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ, श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ, सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ, संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुख युवा आर्थिक विकास महामंडळ यांचा समावेश आहे.
या महामंडळांमार्फत थेट कर्ज योजना (रु. १ लाख), २० टक्के बीज भांडवल योजना (रु. ५ लाख), वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. १५ लाख), शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. २० लाख), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. ५० लाख) तसेच महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना राबविण्यात येत असून लाभार्थ्यांनी संबंधित योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनांबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२७६१५ वर संपर्क साधावा, असेही जिल्हा व्यवस्थापक जे. झेड. राठोड यांनी कळविले आहे.
*-*-*-*-*-


