परभणी, (प्रतिनिधी) जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आज विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची स्थिती आणि शेतीसमोरील अडचणींची आस्थेवाईकपणे चौकशी केली व शेतकऱ्यांना धीर दिला.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी परभणी तालुक्यातील ताडपांगरी, गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, सिरसम शे., डोंगरजवळा या गावांना भेट देऊन पिकांची पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांनी पीक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली असता, शासन आपल्या पाठीशी असून परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घेतला जात आहे, असा धीर जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना दिला. दरम्यान, शासनाच्या सूचनेप्रमाणे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी अहवाल शासनाकडे तात्काळ सादर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ताडपांगरी येथील पिक पाहणीच्या वेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार संदीप राजपुरे, मंडळ अधिकारी सचिन शिंदे, प्रवीण खाडे ग्राम महसूल अधिकारी दीक्षा खंडारे यांच्यासह कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
*मुदतपूर्व पीक कापणी प्रयोगाची पाहणी*
गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी,
सिरसम शे., डोंगरजवळा येथील शेतकऱ्यांच्या शेताला जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी भेट देऊन पिकांची पाहणी केली. महातपुरी येथील शेतकरी राम मुलगीर यांच्या शेतात मुदतपूर्व पिक कापणी प्रयोग घेण्यात आला. त्याची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
दुष्काळसदृश परिस्थितीत शासनाच्या प्रभावी उपाययोजनांसाठी प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती महत्त्वाची असल्याने तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याकरीता जिल्हाधिकाऱ्यांचा हा बांधावरचा दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या समस्या काळजीपूर्वक ऐकून घेतल्या आणि घाबरून जाऊ नका, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असा धीर शेतकऱ्यांना दिला.
****


