परभणी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सलग तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
मानवत, पाथरी व सोनपेठ तालुक्यांतील विविध गावांमध्ये भेट देत त्यांनी पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंड, उपलब्ध पाणीसाठा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या.
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी मानवत तालुक्यातील कोल्हा, मानवत रोड, रत्नापूर, पाथरी तालुक्यातील आष्टी फाटा, पोहेटाकळी, रेणापूर तसेच सोनपेठ तालुक्यातील शेळगाव व खडका येथे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून सोयाबीनसह विविध पिकांची परिस्थिती जाणून घेतली.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, पद्मसिंह देशमुख आणि जिल्हा परिषद सदस्य विद्याताई धोंडगे, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, नितीन गर्जे, सुनील कावरखे, नायब तहसीलदार स्वप्ना अंभुरे, देवेंद्रसिंह चंदेल, तालुका कृषि अधिकारी गोविंद कोल्हे, प्रियंका कावरे, उपकृषि अधिकारी महेश शिंदे, मंडळ कृषि अधिकारी आर. बी. नाईक, जे. एन. प्रधान, सहाय्यक कृषि अधिकारी शीतल भरोसे, वर्षा अंभुरे, कृषि सहायक कल्याण जोगदंड, गटविकास अधिकारी ऋषिकेश सावंत, तलाठी अमोल स्वामी, संघाप्पा देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, “आपत्तीच्या कालावधीत शासनाचे जे नियम लागू असतील, त्या नियमांच्या चौकटीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा पीकविमा काढण्यात आला असून, पीकविमा व प्रत्यक्ष पीकस्थितीच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,” असे त्यांनी सांगितले.
यंदा पावसाचा मोठा खंड पडला आहे. ३० जुलै रोजी अतिवृष्टी झाली; मात्र त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी झालेला पाऊस पिकांसाठी पुरेसा ठरलेला नाही. त्यामुळे पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शासनस्तरावर दुष्काळाच्या अनुषंगाने निर्णयाची प्रक्रिया सुरू असून, शासन निर्णय प्राप्त होताच त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पीक कापणी प्रयोग योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना
पिकांची प्रत्यक्ष स्थिती आणि नुकसान यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी पीक कापणी प्रयोग योग्य पद्धतीने व नियमानुसार घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मंडळ स्तरावर यादृच्छिक पद्धतीने पाच ठिकाणी पीक कापणी प्रयोग करण्यात येणार असून, त्याआधारे नुकसानाचे मूल्यांकन करण्यात येईल. गावपातळीवरील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कृषि विभागाचे अधिकारी जिल्ह्यातील विविध भागात प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जाऊन पाहणी करीत असून, त्याआधारे वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पीकविमा व प्रत्यक्ष पीक पाहणी या दोन्ही बाबींच्या आधारे शेतकऱ्यांना नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.
ग्रामपंचायत स्तरावर शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्याचे आवाहन
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांचे समुपदेशन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले. तसेच उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी शेतकरी व नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
पीक पद्धतीत बदलाची गरज
पावसाअभावी विहिरींमधील पाणीसाठा कमी झाला असून, अनेक ठिकाणी पिकांना आवश्यक पाणी देता आलेले नाही. काही भागात सोयाबीनची उंची वाढली असली तरी फलधारणा झालेली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत पारंपरिक पीक पद्धतीसोबतच उपलब्ध पाणी, हवामान व बाजारपेठेचा विचार करून पीक पद्धतीत टप्प्याटप्प्याने बदल करण्याची गरज असल्याचे कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणी उपलब्धतेनुसार तुती लागवडीसारख्या पर्यायी पिकांचाही विचार करण्याचे आवाहन करण्यात आले.
ऊस पिकाबाबतही शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाकडून नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ऊस कारखान्याकडे जाण्याची शक्यता नसल्यास, संबंधित पिकाची नोंदणी केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार चारा उपलब्धतेसाठी त्याबाबत कार्यवाही करण्याची शक्यता तपासण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन
जिल्ह्यातील सुमारे ८४ टक्के शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी उपलब्ध झाले आहेत. उर्वरित १६ टक्के शेतकऱ्यांनीही फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले. शासनाच्या विविध योजना व अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. वयोवृद्ध शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढताना तांत्रिक अथवा अन्य अडचणी येत असल्यास, अशा विशिष्ट प्रकरणांमध्ये विशेष बाब म्हणून मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बाळू बाजीराव तारे, रामचंद्र भिसे, विजय कडतन, राजेंद्र माणिकराव टोपे, बालासाहेब मारोतराव नाईक, लक्ष्मण वामन गायकवाड, बालासाहेब टेंगसे, ज्ञानेश्वर विश्वनाथ बागवाले यांच्यासह विविध गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून आपल्या अडचणी व पिकांची सद्यस्थिती मांडली.
*****


