परभणी (प्रतिनिधी) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्यामार्फत महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण व योजनांचे परिणाम मूल्यांकन करण्याचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्यात येणार असून, सर्व लाभार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या नियुक्त प्रतिनिधींना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना १० जुलै १९७८ रोजी झाली असून, मागासवर्गीय समाजातील घटकांचे सामाजिक व आर्थिक उत्थान करणे, त्यांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे तसेच त्यांचे जीवनमान उंचावणे हे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उद्देशाने महामंडळामार्फत विविध कर्ज व आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येतात.
सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या १३ मार्च २०२६ रोजीच्या बिगर माहिती तंत्रज्ञान (नॉन-आयटी) शासन निर्णयानुसार, मेसर्स प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची तांत्रिक सहाय्य संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश महामंडळाच्या विविध कर्ज योजनांअंतर्गत कर्जाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची सद्यस्थिती जाणून घेणे हा आहे. यामध्ये कर्जाचा वापर कोणत्या व्यवसायासाठी करण्यात आला, व्यवसायाची सद्यस्थिती काय आहे, रोजगार व उत्पन्नात किती वाढ झाली, योजनांचा लाभार्थ्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर काय परिणाम झाला तसेच कर्ज परतफेडीची सद्यस्थिती काय आहे, याबाबत माहिती संकलित करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणादरम्यान लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्याकडून आवश्यक माहिती घेण्यात येणार आहे. तसेच कर्ज वितरणानंतर व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, व्यवसायाची प्रगती आणि योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी यांचाही अभ्यास करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणातून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे महामंडळाच्या योजनांची परिणामकारकता वाढविणे, भविष्यातील योजनांचे नियोजन अधिक प्रभावी करणे तसेच लाभार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या सर्व लाभार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या नियुक्त प्रतिनिधींना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
*-*-*-*-*-


