जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन; उत्कृष्ट प्रशिक्षक व खेळाडूंना ‘सारथी पुरस्कार’ प्रदान
परभणी, (प्रतिनिधी) : – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या आयोजनातून १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय आर्चरी (धनुर्विद्या) क्रीडा स्पर्धेला आज जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली.

जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील आठ विभागांमधील सुमारे २५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून तीन दिवस धनुर्विद्येतील कौशल्याची चुरस पाहायला मिळणार आहे.
दि. २७ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या स्पर्धेत नागपूर, अमरावती, लातूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या आठ विभागांतील खेळाडू सहभागी झाले आहेत. विविध विभागांतून आलेल्या बाल खेळाडूंना राज्यस्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
उद्घाटनप्रसंगी छत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. प्रा. माधव शेजुळ, जिल्हा क्रीडा अधिकारी कल्याण पोले, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, नारायणराव पिसाळ, राज्य क्रीडा मार्गदर्शक अमर जाधव, क्रीडा मार्गदर्शक शुभांगी रोकडे, तालुका क्रीडा अधिकारी विठ्ठल भालेराव, शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रणजीत काकडे, पत्रकार शिवाजी वाघमारे आणि आर्चरी संघटनेचे सचिव मधुकर क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
*खेळाडूंना अधिक सुविधा उपलब्ध करून देणार – जिल्हाधिकारी*
जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण म्हणाले की, परभणी जिल्ह्यात क्रीडाविषयक चांगले वातावरण असून खेळाडूंमध्ये विविध क्रीडा प्रकारांबाबत उत्साह दिसून येत आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष लक्ष देण्यात येईल. खेळाडूंना सरावासाठी आणि त्यांच्या कौशल्य विकासासाठी जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्याच्या विविध भागांतून आलेल्या खेळाडूंना परभणीमध्ये स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. अशा स्पर्धांमुळे खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती, शिस्त, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. तसेच राज्यस्तरावर आपल्या क्रीडा कौशल्याची ओळख निर्माण करण्यासाठीही या स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा अधिकारी मिलिंद साळवे यांनी केले. सूत्रसंचालन हनुमंत हंबीरे यांनी केले, तर क्रीडा अधिकारी रोहन औंढेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*उत्कृष्ट कार्याबद्दल मान्यवरांना ‘सारथी पुरस्कार’*
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र आर्चरी संघटनेच्या वतीने धनुर्विद्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शक, प्रशिक्षक आणि खेळाडूंना ‘सारथी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते अभिजीत दळवी (आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक, अहिल्यानगर), अशोक जंगमे (तांत्रिक समिती, महाराष्ट्र आर्चरी संघटना, लातूर), रंगराव साळुंके (सचिव, हिंगोली), विवेक क्षीरसागर (राष्ट्रीय खेळाडू, परभणी), छायाताई देशमाने (राज्यस्तरीय पदकप्राप्त खेळाडू) आणि महेश शिंदे (राष्ट्रीय प्रशिक्षक) यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
*स्पर्धेच्या यशस्वितेसाठी क्रीडा विभागाचे परिश्रम*
राज्यस्तरीय स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन यशस्वी करण्यासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, तालुका क्रीडा अधिकारी मिलिंद साळवे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, रोहन औंढेकर, कनिष्ठ लिपिक गजानन तुडमे, मथुरा काथार, प्रकाश पंडित, धीरज नाईकवाडे, योगेश आदमे, शिवाजी काकडे, इरफान शेख, भागवत दुधारे, गजानन भालेराव, निलेश यादव, किशोर ढोके, नागसेन अटकोरे, कैलास टेहरे, यमनाजी भालशंकर, आशिष परदेशी आदींनी परिश्रम घेतले.
तीन दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले असून, धनुर्विद्या क्षेत्रातील नव्या प्रतिभावान खेळाडूंना पुढे येण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
***


