परभणी, (प्रतिनिधी) : मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल, परभणी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील युवकांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त क्रीडा कौशल्य विकसित व्हावे तसेच शारीरिक तंदुरुस्ती, खिलाडूवृत्ती आणि सांघिक भावना वाढीस लागावी, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत १०० मीटर धावणे (मुले व मुली), गोळाफेक (मुले व मुली) आणि कबड्डी (मुले व मुली) अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. सर्व क्रीडा प्रकारांमध्ये युवक व युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले क्रीडा कौशल्य प्रदर्शित केले.

१०० मीटर धावण्याच्या मुलींच्या स्पर्धेत अनुजा अवचार यांनी प्रथम, पूजा इंगळे यांनी द्वितीय, तर मीरा काळदाते यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मुलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत आदित्य राऊत यांनी प्रथम, अथर्व गिते यांनी द्वितीय, तर स्वप्निल काकडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
गोळाफेक मुलींच्या स्पर्धेत पूजा इंगळे यांनी प्रथम, प्रिती तांदळे यांनी द्वितीय, तर अस्मिता थोरवट यांनी तृतीय क्रमांक मिळविला. गोळाफेक मुलांच्या स्पर्धेत स्वप्निल काकडे यांनी प्रथम, आदित्य राऊत यांनी द्वितीय, तर वैभव कदम यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मुलांच्या कबड्डी स्पर्धेत रन अकॅडमी संघाने प्रथम, तर एकलव्य अकॅडमी संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. मुलींच्या कबड्डी स्पर्धेतही रन अकॅडमी संघाने प्रथम, तर एकलव्य अकॅडमी संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
या कार्यक्रमास जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर, क्रीडा अधिकारी सुभाष नाटकर, क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे व प्रकाश पंडित तसेच सहायक कक्ष अधिकारी गजानन गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेसाठी पंच म्हणून यमनाजी भाळशंकर, कैलास टेहरे, गोविंद काजळे, निलेश यादव, गजानन भालेराव, शेख कलीम, आदिनाथ सोळंके, योगेश भाळशंकर, अजय राठोड, सतीश कदम, बालाजी सलगर, वैभव तरंगे, अर्जुन भाळशंकर व अब्दुल खदिर यांनी काम पाहिले. विविध क्रीडा प्रकारांत सहभागी झालेल्या खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले क्रीडा कौशल्य दाखवून दिले. युवकांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण करणे, त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
*-*-*-*-*-


