परभणी, (प्रतिनिधी) निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती के. हरिता यांनी आज परभणी शहरांतील विविध मतदानकेंद्रांना भेट देऊन मतदान केंद्र आणि परिसराची पाहणी केली.
यावेळी निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सचिन कवठे, नायब तहसीलदार अनिता वडवळकर, मंडळ अधिकारी मिलिंद विटेकर, तलाठी रविकांत काळे यांच्यासह नवा मोंढा पोलीस स्टेशन, नानलपेठ पोलीस स्टेशन, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देत मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध कराव्यात. विशेषत: दिव्यांग, जेष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना श्रीमती के. हरिता यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी मतदान केंद्र परिसराची देखील त्यांनी पाहणी केली.



