परभणी (प्रतिनिधी) 96-परभणी विधानसभा मतदारसंघात 2024 साठीच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) आणि VVPAT (मतदार पडताळणी पर्ची यंत्र) मशीनच्या कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पार पडली. सकाळी 9:00 वाजता स्ट्राँग रूमचे सील उमेदवारांच्या उपस्थितीत उघडण्यात आले.
या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी परभणी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे, नायब तहसिलदार अनिकेत पालेपवाड, मास्टर ट्रेनर सुभाष काचगुंडे आणि परभणी महानगरपालिका सहआयुक्त प्रज्ञावंत कांबळे हे उपस्थित होते. मतदारसंघात लढणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींनी देखील या प्रक्रियेची साक्ष दिली.
यावेळी निवडणूक निरीक्षक के. हरिता आणि अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनीही भेट देऊन ईव्हीएम व्हीव्हीपॅट कमिशनिंग व सिलिंगची पाहणी केली. निवडणूक प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम तपासणीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मतांच्या नोंदी आणि मतमोजणी व्यवस्थित होण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा ठरत आहे.
100% व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी करून, प्रत्येक उमेदवारासह NOTA पर्यायालाही एकेक मत देऊन त्यांचे अचूकता परीक्षण केले जात आहे. हे मशीन मतदाराने दिलेल्या मतांची पावती योग्य प्रकारे छापत आहे का, याची खात्री करण्यासाठी हा उपाय करण्यात येतो.
याशिवाय, सर्व उपलब्ध ईव्हीएमपैकी 5% कंट्रोल युनिट्स निवडून त्यावर 1000 मतांचे मॉक मतदान करून त्यांच्या कार्यक्षमतेची तपासणी केली जाते. या प्रक्रियेत प्रत्येक निवडलेल्या मशीनवर मॉक मतदान केले जाते, त्यांचे निकाल पाहून मतांची अचूक नोंद होत आहे का, याची खात्री केली जाते.
या चाचण्यांचे उद्दिष्ट म्हणजे मतदारांचा मतदान प्रक्रियेवर विश्वास वाढवणे आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे. उद्या 13 नोव्हेंबर रोजी ईव्हीएम व्हीव्हीपॅट कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण होणार आहे. (छाया उत्तम बोरसुरीकर)



