परभणी, (प्रतिनिधी):- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध दारु, पैशाची वाहतूक रोखण्यासाठी एसएसटी व एफएसटी पथकांमार्फत जिल्हयात वाहनांची तपासणी केली जात आहे. आज स्वत: निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेश दुग्गल यांनी एफएसटी पथकाच्या माध्यमातून इतर वाहनांसोबतच पोलीसांच्या वाहनांचीही तपासणी केली.
जिंतूर विधानसभा मतदारसंघात पाहणीच्या वेळी श्री. दुग्गल यांनी सदर तपासणी केली. यावेळी त्यांनी परभणी-हिंगोली जिल्हयाच्या सीमेवरील एसएसटी व एफएसटी पथकांना भेट देऊन मार्गदर्शन केले. दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाला काही अवधीच शिल्लक राहिला आहे, त्यामुळे पथकांनी अधिक दक्ष राहावे. वाहनांची काळजीपूर्वक तपासणी करावी. वाहनांमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, अशी सूचना पथकातील कर्मचाऱ्यांना त्यांनी यावेळी केली. श्री. दुग्गल यांनी जिंतूर येथील स्ट्राँगरुमलाही भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. ( छाया- उत्तम बोरसुरीकर)

***


